
कालपासून मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही भागामध्ये अजुनही पावसाला (Rain) सुरुवात झालेली नाही. राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी अजुनही शेतकरी (Farmer) पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. आता मंगळवारपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या वर्षी मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज होता, पण गेल्या महिनाभरात जास्त प्रमाणात पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणी साठ्यात मोठी घट झाली होती. तसेच शेतकऱ्यांनी पेरणीही अजून केली नव्हती. आता पुन्हा पेरणीला सुरुवात झाली आहे.
मुंबईत सलग पाचव्या दिवशी आज मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये सर्व ठिकाणी पाणी भरले होते, मात्र मध्यरात्री पाऊस थांबल्यामुळे सखल भागांमधून पाणी निघून गेला आहे. आज पहाटे पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे,असंच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पुन्हा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होणार आहे.