तळकोकणात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – सावंतवाडी शहरात ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली शहरांमध्ये काही भागात जोरदार पाऊस पडला. यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळपासूनच कमालीची उष्णता वाढली होती. त्यामुळे सर्वांच्याच अंगाची लाहिलाही झाली होती.

दरम्यान सायंकाळी आलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे काजू, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढला होता. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, तर दमट वातावरणात उष्णतादेखील मोठ्या प्रमाणात जाणवत होती. त्यामुळे सायंकाळी पाऊस येणार याची सर्वांनाच खात्री होती.

त्याप्रमाणे सायंकाळी चारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांना दुकान शेडचा आसरा घ्यावा लागला, तर छत्री, रेनकोट नसलेल्या नागरिकांनी अखेर भिजत जाण्यास पसंती दिली.