
पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी कहर केला आहे. हवामान खात्यानुसार पुढील तीन ते चार दिवस कठीण जाऊ शकतात. मान्सून सुरू झाल्यामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती बिकट बनली आहे. पुढील आठवडाभर डोंगराळ भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अजूनही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दोन्ही राज्यांच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, मैदानी भागाबद्दल बोलायचे झाल्यास, पुढील सात दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत भूस्खलन, अचानक पूर आणि मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर डोंगरावर जाणाऱ्या पर्यटकांसाठीही अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. डोंगरावरील अनेक भागात जाण्यास बंदी आहे.
हिमाचल प्रदेशात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तासनतास रस्त्यांवर ट्राफिक जाम दिसत आहे. सुमारे 24 तासांनंतर मंडी चंदीगड महामार्ग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 1 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचलच्या मंडी, शिमला, हमीरपूर, उना, सिरमौर आणि सोलनमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.