T20 WC 2022: ”तो तुम्हाला प्रत्येक सामना जिंकून देऊ शकत नाही”, माजी भारतीय क्रिकेटपटूचं विधान

WhatsApp Group

Madan Lal on T20 WC 2022: भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी टी-20 विश्वचषक 2022मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या विराट कोहलीच्या खेळीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाला विश्वचषक जिंकायचा असेल तर संपूर्ण संघाला चांगली कामगिरी करावी लागेल, एक-दोन खेळाडूंच्या जोरावर विश्वचषक जिंकता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

रविवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने भारतीय संघाला स्वबळावर विजय मिळवून दिला होता. त्याने 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. यावर माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक मदन लाल म्हणाले, ‘विराट कोहलीची खेळी अप्रतिम होती. अशी खेळी मी कधीच पाहिली नाही पण तो तुम्हाला प्रत्येक सामना जिंकून देऊ शकत नाही. ही खूप मोठी स्पर्धा आहे. ते एका व्यक्तीच्या कामगिरीने जिंकता येत नाही.

मदन लाल म्हणाले, ‘रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना त्यांच्या खेळाचा स्तर उंचवावा लागेल. प्रत्येकाने हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की ते नेहमीच त्यांची सर्वोत्तम कामगिरी आणि प्रयत्न करत आहेत.

भारताने पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला विजय कौतुकास्पद असल्याचेही मदन लाल म्हणाले. पण एवढ्या मोठ्या स्पर्धेत सर्वांची कामगिरी चांगली असणे गरजेचे आहे. ते म्हणाले, ‘भारताचे काम अजून झालेले नाही. विश्वचषक नुकताच सुरू झाला आहे. नेदरलँडसारखा संघही कमकुवत नाही. टी-20 मध्ये कोणताही संघ कोणत्याही संघाला हरवू शकतो. विश्वचषक जिंकल्यावरच मिशन पूर्ण झाले असे म्हणता येईल.