महिला विश्वचषक: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला बसला आणखी एक धक्का!

WhatsApp Group

फलंदाजीतील खराब कामगिरीचा फटका भारतीय महिला संघाला आणखी एक सामना गमावून सहन करावा लागला आहे. गतविजेत्या इंग्लंडने बुधवारी चार गडी राखून विजय मिळवत आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गतविजेत्या इंग्लंडसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना होता, ज्यांनी यापूर्वी त्यांचे तीनही साखळी सामने गमावले आहेत. संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

चारपैकी दोन सामने गमावलेल्या भारताच्या अडचणी आता वाढल्या आहेत. कारण एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर जाऊ शकते. हरमनप्रीत बाहेर पडल्यास भारतीय फलंदाजीला मोठा धक्का बसणार आहे.

हरमनप्रीत कौर इंग्लंडच्या डावाच्या 31 व्या षटकात क्षेत्ररक्षणादरम्यान जखमी झाली. फिजिओसोबत बराच वेळ मैदानात राहिल्यानंतर तिच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि ती स्टेडियमच्या बाहेर गेली. हरमनप्रीतची दुखापत अधिक गंभीर झाल्यास भारताच्या अडचणी वाढू शकतात. हरमनप्रीत कौरने सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात 4 सामन्यात 49.75 च्या सरासरीने 199 धावा केल्या आहेत.