CWG 2022: हरमनप्रीत कौरने मोडला धोनीचा मोठा विक्रम, पाकिस्तानचा पराभव करून कॅप्टन कूलला टाकले मागे

WhatsApp Group

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयासह भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. हरमनप्रीत कौर आता क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारी भारतीय कर्णधार बनली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 100 धावांचे लक्ष्य ठेवले होते, सलामीवीर स्मृती मंधानाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ही धावसंख्या सहज गाठली.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली T20 क्रिकेटमध्ये भारताचा 42 वा विजय, तर पुरुष संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली 41 सामने जिंकले. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर हरमनप्रीत कौर भारताची सर्वात यशस्वी कर्णधार ठरली आहे. मात्र, महिला क्रिकेटची सर्वात यशस्वी कर्णधार बनण्यासाठी तिला अजून मेहनत करावी लागणार आहे. महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स (68) आणि ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग (64) हरमनप्रीत कौरच्या पुढे आहेत.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 71सामन्यांमध्ये 41 विजय नोंदवले आहेत. तर 28 सामन्यात पराभव झाला आहे. दुसरीकडे, हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाल्यास, तिच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 71 सामन्यांमध्ये 42 विजय नोंदवले आहेत, तर 26 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या अ गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 18 षटकांत 100 धावांचे लक्ष्य ठेवले होते. स्मृती मंधानाच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 11.4 षटकांत ही धावसंख्या गाठली. अ गटातील भारताचा हा पहिला विजय आहे, तर पाकिस्तान सलग दुसरा सामना गमावून बाहेर पडला आहे. गटात, भारत +1.520 च्या निव्वळ धावगतीने बार्बाडोस आणि ऑस्ट्रेलियाच्या वर आहे.

अ गटातील भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना बार्बाडोसविरुद्ध 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सामना जिंकण्यात भारताला यश आले तर ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.