ICC Men’s ODI Rankings : आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत हार्दिक पांड्याची मोठी झेप तर बुमराहची घसरण

WhatsApp Group

ICC Men’s ODI Rankings : इंग्लंड दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या दोन्ही मालिकांमध्ये टीम इंडियाने ज्या पद्धतीने यजमानांना पराभूत केले त्यामुळे सर्वांचीच मने जिंकली. मात्र, आयसीसीने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत त्याचा मोठा परिणाम झाला आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय मालिकेला मुकलेला जसप्रीत बुमराहला क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आहे, तर अष्टपैलू हार्दिक पंड्याने मोठी झेप घेतली आहे.

गोलंदाजांच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत जसप्रीत बुमराह एका स्थानाने घसरून दुसऱ्या स्थानावर आला आहे. पाठीच्या समस्येमुळे बुमराह शेवटचा सामना खेळू शकला नाही, ज्यामुळे त्याने अव्वल स्थान गमावले. गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट 704 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर बुमराह त्याच्या एका गुणाने मागे आहे. युझवेंद्र चहलने चार स्थानांची प्रगती करत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

दुसरीकडे, हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत 13 स्थानांनी झेप घेत आठवे स्थान पटकावले आहे. इंग्लंडविरुद्ध सहा विकेट्स आणि शतकी खेळी करणारा पंड्या फलंदाजांच्या क्रमवारीत आठ स्थानांनी 42व्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा बेन स्टोक्स चार स्थानांनी घसरला असून तो टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. स्टोक्सने वनडेतून निवृत्ती घेतली असून त्याने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.

याशिवाय पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर भारतीय फलंदाज विराट कोहली चौथ्या आणि रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 125 धावा करणारा ऋषभ पंत 25 स्थानांनी 52 व्या स्थानावर पोहोचला आहे.