धक्कादायक, हार्दिक पांड्याने घेतला क्रिकेट न खेळण्याचा निर्णय
मुंबई – कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा संकटात आला आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या या मालिकेतून बाहेर पडला असून तो या दौऱ्यावर भारतीय संघासोबत जाणार नाही. हार्दिकने बीसीसीआयकडे फिटनेससाठी आणखी काही वेळ मागितला आहे आणि त्यामुळे त्याने हा दौरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हार्दिक पांड्या ने म्हटले आहे की, आता त्याला फक्त फलंदाज म्हणून संघात परत यायचे नाही तर अष्टपैलू म्हणून यायचे आहे. त्यामुळे मी माझ्या फिटनेसवर अधिक काम करणार आहे. IPL 2021 आणि आयसीसी T20 विश्वचषकामध्ये हार्दिकची कामगिरी चांगली झाली नव्हती. या दोन्ही स्पर्धांमध्ये गोलंदाजी न केल्यामुळे त्याच्यावर खूप टीकाही करण्यात आली होती. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हार्दिकने फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुढिल काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संघ निवडीसाठी आपला विचार न करण्याची विनंतीही त्याने केली आहे.
हार्दिक टी-20 विश्वचषकातही सपशेल अपयशी ठरला होता. त्याने केवळ दोन सामन्यांत गोलंदाजी केली आणि त्यातही त्याला काही फार यश मिळाले नाही. त्याने टी-20 विश्वचषकातील पाचही डावात फलंदाजी करताना केवळ 69 धावा केल्या होत्या. आयपीएल 2021 मध्येही त्याची बॅट शांतच राहिली. आयपीएल त्याने 12 सामन्यांमध्ये 14.11 च्या सरासरीने फक्त 127 धावा केल्या होत्या. त्याच्या या निराशाजनत कामगिरीमुळे तो टीकेचा धनी ठरला होता.
बीसीसीआयने हार्दिकला एनसीएला अहवाल देण्याचे आणि फिटनेस कार्यक्रम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. पण, त्याकडे हार्दिकने दुर्लक्ष केले आणि पाठीला दुखापत असूनही खेळत राहिला. भारताला 17 डिसेंबर 2021 ते 26 जानेवारी 2022 यादरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.