हरभजन सिंग – वादळी कारकीर्द, औपचारिक शेवट…

WhatsApp Group

२५ मार्च १९९८ ते २४ डिसेंबर २०२१. हरभजन सिंगने जरी २०१६ नंतर भारतातर्फे एकही सामना खेळलेला नसला तरी त्याच्या कारकिर्दीवर खऱ्या अर्थाने पडदा पडला तो २४ तारखेला. औपचारिक घोषणा करून या गुणी गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. जवळपास १८ वर्षाच्या या प्रवासात या पंजाबी गोलंदाजाने अनेक आठवणी दिल्या तरी २००१ मालिकेच्या उल्लेखाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.

१८-वर्षीय हरभजनने सर्वात आधी कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे पदार्पण केले. १९९८मध्ये त्याची सुरुवात काही साजेशी झाली नाही. पहिल्या ८ कसोटी सामन्यात त्याला केवळ २१ बळी घेता आले. इतकेच नव्हे तर त्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा करण्यात आली होती. २०००मध्ये हरभजनच्या वडिलांचे निधन झाले आणि या उमद्या गोलंदाजाला फार मोठा धक्का बसला. अगदी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी अमेरिकेत जाऊन ट्रक चालवायचा विचार सुद्धा त्याच्या मनात होता. मात्र हरभजनने क्रिकेटला अजून एक संधी देण्याचे ठरवले.

हरभजनने स्वतः एका मुलाखतीत खुलासा करताना सांगितले की २०००नंतर तो शिस्तप्रिय झाला. स्वतःच्या आरोग्यावर त्याने प्रचंड काळजी घेतली आणि हळूहळू त्याची चमक त्याच्या गोलंदाजीत सुद्धा दिसू लागली. पुढील वर्षी दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघासमोर सराव सामन्यात हरभजनने उत्तम गोलंदाजी केली. या सामन्यात कर्णधारपदी असलेल्या वीवीएस लक्ष्मणने हरभजनच्या प्रगतीबद्दल त्याकाळच्या भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला कळवले. गांगुलीने तातडीने लक्ष्मणला निरोप दिला की यापुढे हरभजनला गोलंदाजी देऊ नकोस कारण त्याला ऑस्ट्रेलियन फलंदाजांनापासून लपून ठेवायचे होते.

पुढे घडलेला इतिहास आपणा सर्वांना माहिती आहे. पहिल्या मुंबई कसोटीत केवळ ४ बळी घेतल्यानंतर हरभजनने आपली चुणूक कोलकाताच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात दाखवली. याच कसोटीत तो भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. या मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यात त्याने २८ बळी घेतले आणि मालिकेत एकूण ३२ बळी घेतले. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाला नमवण्यात हरभजनचा सिंहाचा वाटा होता हे स्वतः कर्णधार स्टीव्ह वॉने सुद्धा कबूल केले आहे.

मात्र हे सुद्धा खरे की येणाऱ्या अनेक वर्षात हरभजनला पुन्हा तसे यश संपादता आले नाही. त्याने अनेक उत्तम स्पेल टाकले, अगदी परदेशात सुद्धा, मात्र २००१मध्ये ऑस्ट्रेलियासमोर गाठलेल्या उंचीची सर इतर प्रदर्शनांना नाही. २०११ केप टाउन मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२०/७, २००९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे ६३/६, २००६मध्ये किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध १३/५ ही काही विदेशी खेळपट्ट्यांवरची संस्मरणीय कामगिरी.

कसोटी क्रिकेट पुरते बोलायला गेलं तर हरभजनने १०३ सामन्यात ४१७ बळी घेतले, ज्यातील २६५ हे भारतभूमीवरील होते. भारताबाहेर वेस्ट इंडीज, न्युझीलँड आणि झिंबाब्वे या देशांमध्ये हरभजनला चांगले यश मिळाले याउलट श्रीलंका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथे त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कसोटीत त्याने २ शतके आणि ९ अर्धशतकेसुद्धा झळकावली आहेत.

एकदिवसीय सामन्यांमध्ये हरभजन भारतातर्फे सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये ५व्या क्रमांकावर आहे. त्याने २३४ सामन्यांमध्ये भारतासाठी २६५ बळी मिळवले आहेत. आंतराष्ट्रीय टी२०सामने तो जरी फक्त २५ खेळला असला तरी त्यानं आयपीएल मध्ये खोऱ्याने विकेट्स काढल्या आहेत. १६३ सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने मुंबई, चेन्नई आणि कोलकातासाठी १५० विकेट्स घेतल्या आहेत.

याच कालावधीत हरभजनला अनेक वादग्रस्त प्रकरणांचा सामना करावा लागला. २००२मध्ये न्यूझीलंड विमानतळावर मळलेल्या सॉक्समुळे त्याला दंड ठोठावण्यात आला. २००५मध्ये ग्रेग चॅपलवर उघड टीका केल्यामुळे त्याला माफी मागावी लागली. २००७-०८ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अँड्रयू सायमंड्स बरोबर त्याचा प्रचंड वाद झाला आणि ‘मंकीगेट’ प्रकरण बरेच गाजले. २००८मध्ये आयपीएल सामन्यात श्रीसंथच्या श्रीमुखात भडकावल्यामुळे हरभजनला शिक्षा भोगावी लागली. या शिवाय तो मैदानाबाहेरीलसुद्धा अनेक वादात अडकला होता.

अनिल कुंबळेसारखा फिरकी गोलंदाज शर्यतीत असल्यामुळे हरभजनचे संघातील स्थान दुय्यम होते. मात्र आपल्या ऑफ स्पिनच्या जादूवर त्याने भारतीय क्रिकेट इतिहासात स्वतःचे स्थान निर्माण केले. मैदानावरील कामगिरी असो किंवा मैदानाबाहेरील वाद, हा पगडीधारी स्पिनर सर्वांच्या आठवणीत नक्की राहील.