
Harbhajan Singh Rajya Sabha: 2021 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या हरभजन सिंगने आपली नवी इनिंग सुरू केली आहे. आज त्याने राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही सोमवारी इतर 25 नेत्यांसह राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली.
41 वर्षीय हरभजन सिंग यांनी त्यांच्या शपथविधीचा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले, “संविधान, कायद्याचे राज्य आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी संसद सदस्य (राज्यसभा) म्हणून शपथ घेतली. मी पंजाब आणि देशाच्या लोकांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.. जय हिंद जय भारत.”
Took Oath as Member of Parliament (Rajya Sabha) to protect the Constitution, Rule of Law and Dignity of the House . I will do my best for the people of Punjab and Nation .. Jai Hind Jai Bharat pic.twitter.com/5qkjHEQkn2
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 18, 2022
गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या हरभजन सिंगला आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेसाठी नुकतेच नामांकन दिले होते. पंजाब निवडणुकीदरम्यान ते नवज्योतसिंग सिद्धूसोबतही दिसले होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये जातील अशी अटकळ बांधली जात होती. पण तसे झाले नाही.
हरभजन सिंगने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 103 कसोटी सामने खेळले असून 417 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट आहेत. हरभजन सिंगच्या नावावर 28 T20 मध्ये एकूण 25 विकेट आहेत.