“यायचं तर या, नाहीतर तुमची मर्जी!”; बांगलादेशच्या आडमुठ्या धोरणावर हरभजन सिंगचा संताप, दिला कडक इशारा
नवी दिल्ली: भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या आयोजनावरून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) घेतलेल्या भूमिकेमुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने या वादात उडी घेत बांगलादेशला चोख प्रत्युत्तर दिले आहे. “बांगलादेशला भारतात खेळायला यायचे आहे की नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे,” अशा कडक शब्दांत भजीने बांगलादेशला सुनावले आहे.
टी२० वर्ल्ड कपच्या स्थलांतराची मागणी
२०२६ चा टी२० वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार आहे. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला (ICC) एक पत्र लिहून त्यांचे सामने भारताबाहेर खेळवण्याची विनंती केली आहे. भारतीय भूमीवर आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचे कारण बांगलादेशने दिले आहे. मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्याचा राग या भूमिकेमागे असल्याचे बोलले जात आहे.
हरभजन सिंगने सुनावले खडे बोल
एएनआई (ANI) शी बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, “बांगलादेशमध्ये अलीकडच्या काळात ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या अत्यंत चुकीच्या आहेत. आम्ही भारतात सर्वांचे मनापासून स्वागत करतो, पण त्यांना येथे यायचे नसेल तर त्यांची मर्जी. त्यांच्या विनंतीवर आयसीसीने काय तो निर्णय घ्यावा.” बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील अत्याचार आणि शेख हसीना यांना मिळालेली भारताची मदत यामुळे बांगलादेशमध्ये भारताविरोधी वातावरण निर्माण झाले आहे, ज्याचे पडसाद आता क्रिकेटवर पडताना दिसत आहेत.
मुस्तफिजुर रहमान आणि केकेआर वाद
कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले होते, मात्र नंतर त्याला संघातून वगळण्यात आले. या निर्णयाची बांगलादेशच्या क्रीडा मंत्र्यांनी निंदा केली होती. बीसीसीआयच्या निर्देशानंतरच केकेआरने हे पाऊल उचलल्याचा दावा बांगलादेशकडून केला जात आहे. यामुळे दुखावलेल्या बांगलादेशने आता थेट वर्ल्ड कपच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
