वाढदिवस भारताच्या पहिल्या विश्वविजयी कर्णधाराचा!
“पाजी की कर रहे हो?” “इंटरव्यू इंग्लिश विच है!!”
“तुस्सी क्या बोलोगे?!”
नवजवान नवज्योत सिंग सिद्धू कपिल देव ला अज्ञात गोष्टीची भीती दाखवत बोलला. सर्वार्थाने रांगडा कपिल देव रामलाल निखंज तितक्याच बेदरकारपणे बोलला, “जो होगा देखा जाएगा”. भारतीय क्रिकेटमधील अज्ञाताची भीती घालवण्याचे श्रेय कपिल देव ला जात असावे. “जे होईल ते होईल” हा त्याच्या खेळाचा मूलमंत्र.
हरियाणाचा असल्यामुळेही असल्याने कदाचित, पण कपिलचा रांगडेपणा वरवरचा नव्हता. जे काही आत तेच बाहेर… हा एकंदरीत मामला. त्यामुळे खेळाडूंच्या कडे असणारा दिलदारपणा त्याच्याकडे होताच, पण त्याला अस्सल, खऱ्याखुऱ्या रांगडेपणाची जोड मिळाल्यामुळे त्याचे एक अत्यंत लोभस व्यक्तिमत्व होत गेले.
भारतीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी विभागात, वेगवान गोलंदाजी हा रकाना नेहमीच मोकळा होता. पूर्वापार मध्यमगती आणि फिरकीवर अवलंबून असलेला संघ हीच भारतीय संघाची ओळख. त्याला बदलण्याचे काम कपिल ने केले. १९७८ मध्ये त्याच्या पदार्पणा बरोबरच भारताला अस्सल वेगवान स्विंग गोलंदाज मिळाला. त्याच दौऱ्यात पहिल्याप्रथम त्याला खेळणारे पाकिस्तानी फलंदाज अनपेक्षित पणे वेगाने येणारे आणि हेल्मेटवर आदळणारे बाऊन्सर बघून चकित झाले होते. पुढे १६ वर्षे तो संघाचा मुख्य भारवाहक गोलंदाज होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा तो पहिला गोलंदाज. तो ज्यावेळी आला तेव्हा एकदिवसीय क्रिकेट अगदी शैशवात होते, कसोटी हाच मुख्य प्रकार! त्यामुळे या प्रकारात, अन्य क्षेत्रात सुरुवातीला असतो तसा, प्रगतीला भरपूर वाव होता. त्यामुळे इथे जे काही होईल ते नवनवेच, आणि विक्रमी होते. अशा काळात कपिलदेवने अचंबित करणाऱ्या वेगाने बळी घेतले. कसोटीमध्ये सातत्याने लांब स्पेल टाकणारा तो मुख्य गोलंदाज होता. त्याचबरोबर तो एक अत्यंत आक्रमक फलंदाज देखील होता. ज्या काळात आपल्या संघाला अष्टपैलू लाभणे हेच आश्चर्य होते, त्याकाळात कपिल देव जगातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलूंपैकी एक होता.
१९८०-८१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुसऱ्या कसोटीत संघ अडचणीत होता. पहिली कसोटी हरलेली, आणि दुसऱ्या कसोटीत बचाव करायचा होता १४३ धावांचा! आजारी असतानाही अंगदुखीची इंजेक्शन घेऊन त्याने ऑस्ट्रेलियन मध्य फळी कापून काढताना २८-५ बळी घेतले होते. पुढे त्याच्याकडे कर्णधारपद येणे हे साहजिकच होते, त्याप्रमाणे विश्वचषका आधी ते त्याच्याकडे आले.
ईस्ट आफ्रिका सोडता भारताला विश्वचषकात विजय म्हणजे काय हे माहीत नव्हते. दोन विजय आणि दोन पराजया नंतर, झिम्बाब्वे विरुद्ध नेव्हील ग्राउंड, रॉयल टर्नब्रिज वेल्सवर इतिहास घडला. पडझड झालेल्या स्थितीत कपिल फलंदाजीला आला तेव्हा निम्मा संघ परतला होता. अशावेळी रॉजर बिन्नी आणि नंतर मदनलाल ला सोबत घेऊन कपिल “कॅप्टन्स नॉक” खेळला. १३८ चेंडूत १७५ धावा करताना त्याने तब्बल १६ चौकार आणि ६ षटकार मारले! एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळयांपैकी एक गणली जाते ही खेळी.
पुढे अंतिम सामन्यात आपण १८३ मध्ये कसे आटोपलो, रिचर्डसने कत्तल कशी सुरू केली आणि कपिलने मागे पळत पळत २० यार्ड जात घेतलेला कॅच ही कथा आता भारतीय क्रिकेट लोककथांमध्ये अजरामर झाली आहे. तो कॅच वर्ल्ड कप आणि त्यामुळे भारतीय क्रिकेटला कलाटणी देणारा ठरला. त्याच्या त्या रांगड्या हास्यासाहित विश्वचषक स्वीकारणारा कपिल देव हे चित्र पुढील भारतीय पिढ्यांसाठी प्रेरणेचा, अभिमानाचा अक्षय्य स्रोत होऊन गेले!
या प्रचंड विजयासह क्रिकेट मुळापासूनच बदलले.. अफाट पैसा क्रिकेटमध्ये येण्याचे सर्व मार्ग उघड झाले. अशावेळी अन्य क्षेत्रात येतात तशा क्रिकेटमध्येही अपप्रवृत्ती येणार हे ओघाने आलेच. अशावेळी संघ प्रमुख म्हणून त्याचा पहिला सम्पर्क कपिल सोबतच आला असावा. तरीही अशा प्रवृत्तींना स्वतःपासून आणि त्यामुळे भारतीय क्रिकेटपासून लांब ठेवण्याचे अवघड काम कपिल ने केले. कोणत्याही क्षणी पाय घसरून पडण्याची भीती अशावेळी असताना कपिलमधील रांगड्या तरीही सच्च्या खेळाडूने खेळाचे पावित्र्य जपले! त्याने एक कुख्यात सट्टेबाजाला संघाच्या खोलीतून बखोटीला धरून बाहेर काढल्याची कथा देखील ऐकली आहे. हे करण्यासाठी लागणारा खरेपणा त्याच्यात पुरेपूर होता.
८३ च्या शेवटी कसोटीत त्याच्या नावे २५० बळी होते. पुढील पाच वर्षात त्याच्या नावे सर्वाधिक बळींचा विक्रम झाला असता, परंतु दुखापतींमुळे त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. त्याची गोलंदाजी करतानाची उडी हरपली… तरीही पुढील दहा वर्षात त्याला दुखापतींमुळे एकदाही विश्रांती घ्यावी लागली नाही. रोजच्या दोन दोन ग्लास भरून पिलेल्या दुधाची कमाल असावी ती!
क्रिकेट बदलत गेले, स्पर्धा वाढली खिलाडूवृत्ती कमी झाली. तरीही कपिल नामक साधा गडी ती कधी विसरला नाही. १९८७ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा स्कोर २६८ वरून २७० करताना त्याने दाखवलेली खिलाडूवृत्ती, भारताला केवळ एक धावेने महागात पडली तरीही त्याने त्याची कास कधीच सोडली नाही.
रंगीत कपड्यातील क्रिकेट हळूहळू रुळायला लागले होते. सचिन, कांबळी हे युवा खेळाडू तर श्रीनाथ, प्रभाकर सारखे वेगवान गोलंदाज संघात येऊ लागले होते. या सगळ्यांचा मार्गदर्शक कपिलच होता. श्रीनाथ आणि प्रभाकर तर त्याच्याकडून अनेक ट्रिक्स ऑफ ट्रेड शिकले… त्याचबरोबर विश्वचषक विजयाच्या त्याच्या अनुभवामुळे अजून काही उत्तुंग, उत्कृष्ट करण्याची एक संस्कृती आपल्या संघात पुढील दोन दशके रुजली आणि वाढली, त्यामागे कपिलचा विश्वचषक विजय असावा.
गोलंदाजीत त्याचा नैसर्गिक आउटस्विंगर अत्यंत जहरी होता. पुढे अनुभवासोबत येणाऱ्या शहाणपणातून नवनवीन अस्त्रे त्याने आपल्याकडे जमवली. पाच हजाराहून अधिक धावा आणि चारशेहून कसोटी बळी मिळवणारा तो एकमेव क्रिकेटपटू! कसोटीत चारशे बळी मिळवणारा दुसरा गोलंदाज… हे अनोखे विक्रम त्याने गाठले. त्यामुळेच डिकी बर्ड सारखा महान पंच देखील त्याला सर्वश्रेष्ठ अष्टपैलूंमध्ये मानतो.
भारतीय क्रिकेटमध्ये आलेले मॅच फिक्सिंग वादळ त्याच्यावर आरोपाचे शिंतोडे उडवून गेले… परंतु त्याच्या शुभ्र चारित्र्यावर ते किंचितही टिकले नाहीत. सर्व आरोपातून तो तावून सुलाखून निघाला… ते करताना देखील त्याच्यातील अस्सल रांगडा गडी आत तसाच जिवंत होता… ८३ चा विश्वचषक हसत स्वीकारताना जसा होता तसाच एका टीव्ही शो मध्ये व्यथित होऊन रडताना देखील होता. त्याच्या पाठीवर थाप देत सांत्वन करणारा अर्जुना रणतुंगा आणि रडणारा कपिल हे दृश्य अजूनही तितकेच सच्चे वाटते, त्यामध्ये लेषमात्रही खोटेपणा नव्हता… तसा तो त्याच्या जवळपासही नव्हता… कधीच. एका जाहिरातीत तो म्हणतो “पामोलिव दा जवाब नही” तसा त्याचाही नाहीच आहे… जवाब!
कपिलदेव रामलाल निख(ळ)ज! एकदम अनुरूप म्हणता येईल अशी फोड… निखळ निखंज…! Happy Birthday Kapil Paaji.