वाढदिवस विशेष: शेवटच्या षटकात मॅच फिरवणारा ‘हुकमी एक्का’
भारताचा वेगवान आणि आक्रमक गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा आज वाढदिवस. आज आपण जाणून घेणार आहोत जसप्रीत बुमराहच्या क्रिकेटविश्वातील प्रवासाबद्धल.
यॉर्कर किंग आणि आक्रमक गोलंदाज अशी ओळख निर्माण करणारा जसप्रीत बुमराहचा जीवनप्रवास सोपा नव्हता. बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1996 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. बुमराह सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे गंभीर आजारमुळे निधन झाले. त्यानंतर बुमराहची संपूर्ण जवाबदारी त्याच्या आईने घेतली. त्याचे शालेय शिक्षण हे निर्माण हायस्कूल अहमदाबाद येथे झाले. शालेय जीवनात बुमराह भरपूर खेळ खेळायचा मात्र त्याने क्रिकेट खेळाला पसंती दिली होती. वेगळेपण म्हणजे त्यावेळी त्याचे सर्व मित्र बॅटिंग करायला पाहायचे मात्र बुमराह फक्त गोलंदाजी करण्यावर लक्ष देत असे.
बुमराह शालेय जीवनात क्रिकेट खेळत राहिला त्यामुळे त्याच्या मनात क्रिकेटर होण्याची इच्छा पक्की झाली होती. 14 वर्षांचा असताना त्याने आपल्या आईकडे क्रिकेटर होण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या गोलंदाजीतील आक्रमकता पाहून पुढे एम आर एफ फाऊंडेशन मध्ये त्याची निवड करण्यात आली. एम आर एफ फाऊंडेशन हे चेन्नई येथे आहे जे वेगवान गोलंदाजांच्या प्रशिक्षणासाठी एक सेंटर आहे, ज्यात अनुभवी प्रशिक्षकांकडून गोलंदाजीचे धडे दिले जातात. इथेच भारताचे वेगवान गोलंदाज झहीर खान, इरफान पठाण, मुनाफ पटेल, आर पी सिंह, श्रीसंत यांनी प्रशिक्षण घेतलं.
येथे आल्यानंतर बुमराहची गोलंदाजी पाहून ऑक्टोबर 2013 मध्ये गुजरातच्या अंडर-19 संघात निवड झाली. यावेळी त्याने आपला पहिला सामना विदर्भ क्रिकेट संघाविरूद्ध खेळला ज्यात बुमराहने 7 विकेट्स मिळवले. त्यानंतर बुमराहने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये देखील चांगली गोलंदाजी करत एक अनोखी ओळख निर्माण केली होती.
2013 मध्ये मिळाली मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएल खेळण्याची संधी
वेगवान आणि आक्रमक गोलंदाजी पाहता मुंबई इंडियन्सच्या संघाने बुमराहला संघातून खेळण्याची संधी दिली. 2013 मध्ये जॉन ब्राइट यांनी मुंबईच्या संघातून बुमराहला खेळवले. अश्या प्रकारे बुमराहने 19व्या वयात आयपीएल मध्ये पदार्पण केलं. आयपीएल मध्ये पहिला सामना खेळताना बुमराहने बंगळुरू विरुद्ध 32 रन देत 3 विकेट्स मिळवल्या होत्या.
2016 मध्ये मिळाली भारतीय संघाकडून खेळण्याची संधी
आयपीएल मधील बुमराहची कामगिरी पाहता पुढे 27 जानेवारी 2016 मध्ये भारताच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली. चांगली कामगिरी करत बुमराह 2016 यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमद्धे सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला. भेदक आणि आक्रमक गोलंदाजी पाहता पुढे त्याला भारताकडून आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली. दिलेल्या संधीचं सोनं करत आंतरराष्ट्रीय संघात त्याने आपले स्थान पक्क केलं होतं. त्यानंतर त्याच्या कामगिरीमुळे तो भारताचा नव्हे तर जगतला सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून गणला जाऊ लागला. शेवटच्या षटकांत मॅच फिरवणे ही त्याची ओळख झाली.
एका सर्वसाधारण कुटुंबातून आलेला हा खेळाडू आज जगातला घातक आणि वेगवान गोलंदाज समजला जातो.