आजपासून निम्मे राज्य निर्बंधमुक्त; ७० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना दिलासा

WhatsApp Group

मुंबई – राज्यातील कोरोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर आता बुधवारपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्हयांमधील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यानुसार उपाहारगृहे, चित्रपट व नाटय़गृहे आदी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मुभा देण्यात येणार आहे.

राज्यात याआधी १ फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाटय़गृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली होती. तसेच लग्नसमारंभासाठी दोनशे तर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवरील निर्बंध रद्द लावण्यात आला होता.

मात्र अजूनही राज्यात ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क, उपाहारगृहे, नाटय़गृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे बंधन होते. मात्र गेल्या महिनाभरामध्ये राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. रविवारी राज्यात आतापर्यंतची सर्वात कमी अशी ४०७ रुग्णांची नोंद झाली.

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, गोंदिया, चंद्रपूर, सांगली, पालघर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांमधील लसीकरण ७० टक्क्यांपेक्षा (दुसरी मात्रा) अधिक असल्यामुळे तेथील निर्बंध मागे घेण्यात येतील. मात्र एखाद्या जिल्ह्यामध्ये अजूनही जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्यास तेथे निर्बंध कायम ठेवण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. उपनगरीय रेल्वेत लसीकरण न झालेल्यांनाही प्रवासाची मुभा देण्याबाबत सरकारने तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्याबाबतचा निर्णय उद्या न्यायलयामध्ये होण्याची शक्यता आहे.