Gujarat Titans ने IPL चे विजेतेपद पटकावत रचला इतिहास, ५ वर्षांनी मिळाला नवा चॅम्पियन

WhatsApp Group

कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने Gujarat Titans इंडियन प्रीमियर लीगचे २०२२ चे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 final च्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा Rajasthan Royals 7 गडी राखून पराभव करून IPL ट्रॉफी जिंकली. यासह हार्दिक पांड्या आयपीएल इतिहासातील तिसरा कर्णधार बनला आहे, ज्याने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मोसमात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याच्याआधी शेन वॉर्न आणि रोहित शर्मा यांनी ही अप्रतिम कामगिरी केली आहे. गुजरातने जेतेपद पटकावल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 130 धावा केल्या, जे गुजरातने 11 चेंडू शिल्लक असताना तीन विकेट गमावून पूर्ण केले. गुजरातकडून कर्णधार हार्दिक 34 आणि शुभमन गिलने नाबाद 45 धावा केल्या. या पराभवामुळे राजस्थानचे तब्बल 14 वर्षांनंतर विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.


राजस्थानकडून मिळालेल्या 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने 9 धावांवर रिद्धिमान साहा (5) याच्या रूपाने पहिली विकेट गमावली. त्यानंतर संघाने 23 धावांवर मॅथ्यू वेडची (8) धावांवर दुसरी विकेट गमावली. यानंतर शुभमन गिल (नाबाद 45) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (34) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूत 63 धावांची भागीदारी करत गुजरातला अडचणीतून बाहेर काढले. गुजरात ८६ धावांवर असताना हार्दिक बाद परतला. तो युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. हार्दिकने ३० चेंडूत तीन चौकार आणि एक षटकारासह 34 धावा केल्या.

हार्दिक बाद झाल्यानंतर गुजरातला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या 30 चेंडूंमध्ये 34 धावा करायच्या होत्या आणि डेव्हिड मिलर आणि गिल क्रीजवर उपस्थित होते. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 29 चेंडूत 47 धावांची भागीदारी करून गुजरातला सात विकेट्स शिल्लक असताना विजेतेपद मिळवून दिले. मिलरने 19 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 32 धावांची नाबाद खेळी खेळली.

तत्पूर्वी, गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत राजस्थान रॉयल्सला 9 विकेट्सच्या मोबदल्यात 130 धावांवर रोखले. कर्णधार हार्दिक पंड्याने चार षटकांत अवघ्या १७ धावांत तीन बळी घेतले, तर अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशीद खानने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत चार षटकांत केवळ १८ धावांत एक बळी घेतला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तरीही त्याचा एकही फलंदाज टिकूवन खेळू शकला नाही. जोस बटलर (35 चेंडूत 39) आणि यशस्वी जैस्वाल (16 चेंडूत 22) यांना काही धावा करता आल्या.