गुजरातने विजयासह IPL मध्ये केलं पदार्पण, टायटन्सने केएल राहुलच्या लखनऊचा 5 विकेट्सने केला पराभव

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग IPL च्या 15 व्या हंगामातील चौथा सामना गुजरात टायटन्स Gujarat Titans  आणि लखनऊ सुपर जायंट्स Lucknow Super Giants यांच्यात खेळला गेला. गुजरात टायटन्सने हा सामना 5 विकेटने जिंकत आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचवेळी केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. लखनऊ सुपर जायंट्सचा देखील हा आयपीएलमधील पदार्पणचा सामना होता.

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने hardik pandya नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 158 धावा केल्या. मात्र, लखनऊसाठी दीपक हुडाने 55 आणि आयुष बडोनीने 54 धावा केल्या. कृणाल पांड्याने 21 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने 3, वरुण आरोनने 2 आणि रशीद खानने एक विकेट घेतली.


दुसरीकडे 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र संघाने छोट्या भागीदारी करत लक्ष्य गाठले. गुजरात टायटन्सने 19.4 षटकांत 5 गडी राखून लक्ष्याचा पाठलाग करत सामना 5 गडी राखून जिंकला. गुजरात संघाकडून फलंदाजी करताना राहुल तेवतियाने 24 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 33 धावा केल्या, तर मॅथ्यू वेड आणि डेव्हिड मिलर प्रत्येकी 30 धावा करून बाद झाले. अभिनव मनोहर 7 चेंडूत 15 धावा काढून नाबाद परतला. लखनऊ सुपर जायंट्सकडून दुष्मंथा चमीराने दोन, तर आवेश खान, कृणाल पांड्या आणि दीपक हुडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.