पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ अधिसभा सभागृहाचा नामकरण सोहळा संपन्न

WhatsApp Group

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा सभागृहाचे ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह’ असे नामकरण उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रशस्त वातानुकुलित हॉल, अद्ययावत साऊंड सिस्टीम, बैठक व्यवस्था तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह आहे.  अधिसभा सभागृहाला भारताचे कृषीमंत्री, शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचविणारे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव विद्यापीठ अधिसभेत सदस्य डॉ. रविंद्र मुंद्रे यांनी मांडला होता.  त्यांचा ठराव सर्वानुमते सभागृहाने मान्य केला.

स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाचे विमोचन उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे हे विद्यार्थी केंद्री धोरण राबविणारे कुलगुरु तसेच उत्कृष्ट प्रशासक होते. विद्यापीठामध्ये काम करताना अल्पावधीत विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय बनले. त्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे प्राध्यापकांसह विद्यार्थीही प्रभावित झाले होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे एक अभ्यासू, दूरदृष्टी असणारा मार्गदर्शक तसेच शिस्तप्रिय व्यक्ती हरपला. त्यांनी केलेले कार्य पुढील पिढीला मार्गदशक ठरावे यासाठी त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकामध्ये स्मृती स्वरुपात जतन करण्यात आले आहे. या पुस्तकांच्या रुपाने त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, असेही ते यावेळी म्हणाले.

पुस्तकाचे लेखक डॉ. मनीष गवई यांनी यावेळी ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली. स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या पत्नी श्रीमती दिपाली मालखेडे यांनी यावेळी त्यांच्या सहवासात घालविलेल्या स्मृतींना उजाळा दिला.