दिल्ली – हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना आज ‘वीर चक्र’ प्रदान करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी अभिनंदन हे हवाई दलात विंग कमांडर होते आणि त्यांनी पाकिस्तानचे F-16 विमान पाडले होते. राष्ट्रपती भवनात हा सन्मान सोहळा सुरू झाला आहे.
14 फेब्रुवारी 2019 रोजी, पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुलवामा येथे CRPF च्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने २६-२७ फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानातील बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. भारताच्या या हवाई हल्ल्यात पाकिस्तानात बसलेले ३०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
27 फेब्रुवारी रोजी, हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई दलाने त्यांना हाकलून लावले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन हे मिग-21 विमान उडवत होते. त्याच विमानातून त्यांनी पाकिस्तानचे F-16 पाडले. मात्र, नंतर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले, त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले होते. भारताच्या दबावाखाली पाकिस्तानने सुमारे 60 तासांनंतर अभिनंदन यांना सोडले होते.
Balakot air strike hero #AbhinandanVarthaman awarded Vir Chakra by President #RamNathKovind for his feat against Pakistan in February 2019@IAF_MCC @DefenceMinIndia @rashtrapatibhvn @rajnathsingh @narendramodi @PMOIndia pic.twitter.com/QwC0kRhBXH
— DD News (@DDNewslive) November 22, 2021
अभिनंदन यांनी विमान मिग-21 वरून पाकिस्तानचे F-16 विमान उडवले. त्यामुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले. याचे कारण F-16 हे अत्यंत प्रगत लढाऊ विमान होते, जे अमेरिकेने बनवले होते. तर मिग-21 हे 60 वर्ष जुने रशियन बनावटीचे विमान होते. भारताने 1970 च्या दशकात रशियाकडून मिग-21 खरेदी केले होते.
या शूरवीरांनाही गौरवण्यात आले
- दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेत शहीद झालेले लष्कराचे सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या पत्नी आणि आईने राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला.
- दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झालेले मेजर विभूती शंकर धोंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. या कारवाईत ५ दहशतवादी मारले गेले.
- शहीद नायब सुभेदार सोंबीर यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या कारवाईत त्यांनी A++ श्रेणीतील दहशतवाद्याला ठार केले होते.