भाजपकडून आमदारांना व्हिप जारी, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार!

WhatsApp Group

विधानसभा अध्यक्षपद निवडीचा मुद्दा हिवाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात असतानाही सुटलेला नाही. ही प्रक्रियाच नियमबाह्य असल्याच्या राज्यपालांच्या रेड सिग्नलनंतर विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. त्यातच, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आल्यानं हा मुद्दा आता नव्या राजकीय वळणावर येऊन ठेपला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एन्ट्रीनंतर महाविकास आघाडीसमोर नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेतील बदल घटनाबाह्य असल्याचं सांगत राज्यपालांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक प्रक्रियेतील बदलांच्या कायदेशीर अभ्यासासाठी वेळ हवा असल्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा अधिकार उपाध्यक्षांना आहे का? १२ आमदार निलंबित असताना ही निवडणूक घेता येऊ शकते का? असे सवाल राज्यपालांनी उपस्थित केले आहेत. राज्यपालांच्या या नव्या खेळीमुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

राज्यपालांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांची तातडीची बैठक पार पडली. राज्यपालांनी आक्षेप घेतलेल्या मुद्दयांवर मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे पुराव्यासहीत उत्तरं दिली आहेत. निवड प्रक्रियेतील बदलांच्या योग्यतेबाबत या पत्रात सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मात्र, तरीही राज्यपालांनी त्यांचा निर्णय न कळवल्यास निवडणुकीबाबत त्यांना अवगत केल्याचा शेरा मारुन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यक्ष निवडीचा ठराव करता येतो का? याबाबतची चाचपणी सध्या सरकारकडून करण्यात येत आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदावरून काँग्रेसच्या नाना पटोलेंनी फेब्रुवारीत राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद आजतागायत रिक्त आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या पदासाठीची निवड प्रक्रिया गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा ठराव विरोधकांच्या आक्षेपानंतरही सभागृहात मंजुर झाला. गुप्त मतदानात महाविकास आघाडीची मतं फुटतील, या भीतीनं नियमात बदल केल्याचं सांगत भाजपनं आपला विरोध लावून धरला. विरोधकांच्या या आक्षेपाला आता राज्यपालांनीही हवा दिल्यानं अध्यक्षपदाच्या निवडीची वाट आणखी बिकट झाली आहे.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही निवडणुकीसाठी राज्यपालांनी परवानगी दिली नाही, तर विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी असल्याचं शिवसेना नेते आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भाजपकडून आमदारांना व्हिप जारी झाल्यानं या निवडणुकीबाबत आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. ऐनवेळी भाजपकडूनही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या सभागृहात महाविकासआघाडीकडे २८८ पैकी १७० आमदारांचं संख्याबळ आहे. तर भाजपकडे १०६ सदस्य आहेत. महाविकास आघाडीतील कुरुबुरींमध्ये १७० सदस्यांचं संख्याबळ गुप्तमतदानात कायम राखण्याचं आव्हान आवाजी मतदानाचा ठराव संमत करून सरकारनं पलटवून लावलं आहे. मात्र, आता या प्रक्रियेलाच राज्यपालांनी रेड सिंग्नल दिल्यामुळे त्यातील अडथळे दूर करण्याचं आव्हान सरकारपुढे आहे. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्या पाहता विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या अभ्यासासाठी राज्यपाल फार वेळ घेण्याची शक्यताच जास्त आहे. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेला नवा अध्यक्ष भेटणार की त्यासाठी विशेष अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

 

ताज्या बातम्या – 

शिवसैनिकावरील हल्ल्यानंतर सेना-भाजप वाद शिगेला, निवडणुकीच्या तोंडावर राणेंना अटक होणार का?

बलात्कार प्रकरणातील दोषीला फाशी, अ‍ॅसिड हल्लेखोराला आजन्म कारावास, वाचा शक्ती कायद्यातील तरतुदी