टोमॅटोच्या दराबाबत देशात सर्वत्र चर्चा सुरू असून, किरकोळ बाजारात त्याचा भाव 300 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. मात्र यापूर्वी मोठे पाऊल उचलत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने टोमॅटो 90 रुपये किलोने विकण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाने टोमॅटोच्या किमती कमी केल्या आहेत. आता 90 रुपये किलो ऐवजी सरकारी दराने टोमॅटो 80 रुपये किलो दराने विकला जाणार आहे.
टोमॅटोच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली एनसीआरसह देशातील विविध भागात सरकार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थेट टोमॅटोची विक्री करत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी केल्यानंतर, NCCF थेट ग्राहकांना 90 प्रति किलो दराने टोमॅटो विकत होते आणि आता त्याची किंमत 10 ते 80 रुपये प्रति किलोने कमी झाली आहे. सरकार देशभरात जवळपास 500 ठिकाणी थेट टोमॅटोची विक्री करत आहे.
नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) ने सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून टोमॅटो खरेदी केले आहेत. यानंतर ओखला आणि नेहरू प्लेससारख्या भागात किरकोळ दुकाने सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय दिल्ली-एनसीआर भागात २० हून अधिक मोबाइल व्हॅनही तैनात करण्यात आल्या आहेत.