मुलींचं लग्नाचं वय २१ झाल्यास फायदा की तोटा?

WhatsApp Group

लग्नाचं वय वाढल्यास शिक्षण आणि करिअर करण्यासाठी मुलींना उसंत मिळणार आहे. नोकरीसाठी समाजात वावरल्यानं व्यावहारिक ज्ञानात भर पडणार आहे. प्रगल्भता वाढल्यानं आपसुकच बऱ्या-वाईट गोष्टींमधला फरक त्यांना कळेल. शिवाय आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यानं पुरुषांप्रमाणेच त्यांच्याही शब्दाला मान असेल. घरात फक्त पुरुषावरच घर चालवण्याचं दडपण येणार नाही.देशात मुलींचं लग्नासाठीचं वय १८ वरुन २१ करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याबाबतचं विधेयक संसदेत पारित झाल्यानंतर देशात तसा कायदा अस्तित्वात येईल. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावर भाषण करताना मुलींच्या लग्नाचं कायदेशीर वय वाढवण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले होते. मुलींच्या लग्नाच्या वयासंदर्भातील या प्रस्तावाबाबत समाजात मतमतांतर आहे. लग्नासाठीचं वय वाढल्यानं साहजिकच युवा वर्गांतून स्वागत करण्यात येत आहे. मात्र, काहींना असा कायदा झाल्यास गरीब कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये भर पडणार असल्याचं वाटत आहे.

बालविवाहासारख्या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा अस्तित्वात असतानाही गुप्तपणे आजही ग्रामीण भागात मुलींचे कोवळ्या वयात हात पिवळे केले जात आहेत. ही प्रथा रोखण्यासाठी सरकार आणि सामाजिक संघटनांचा लढा सुरुच आहे. लग्न उशीरा झाल्यास मुलींचा पाय घसरेल, जास्त शिकल्यास डोईजड होईल, या बुरसटलेल्या मानसिकतेतून कमी वयात मुलींवर लग्नाची जबाबदारी लादली जाते. देशात स्त्रियांमध्ये अनिमियाची समस्या मोठी आहे. अशात बाळंतपण लादल्यास अर्भक, बाळंतिणीचा मृत्यू, कुपोषण, रक्तक्षयासारखे आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. महिलांच्या आरोग्यावरील हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी मुलींचं लग्नाचं वय वाढवणं हा योग्य पर्याय आहे. लग्नासाठी मुलींचं वाढलेलं वय ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबांसाठी चिंता वाढवणारं देखील आहे. वयाच्या २१ वर्षांपर्यंत मुलींचं संगोपन कसं करायचं, त्यांच्या सुरक्षिततेचं काय, शिक्षणाचा खर्च कसा भागणार असे अनेक प्रश्न या कुटुंबांसमोर आहे. या समस्यांबाबत सरकारकडे काही योजना आहेत का याबाबत सध्या अस्पष्टता आहे.

लग्नाचं वय वाढल्यास शिक्षण आणि करिअर करण्यासाठी मुलींना उसंत मिळणार आहे. नोकरीसाठी समाजात वावरल्यानं व्यावहारिक ज्ञानात भर पडणार आहे. प्रगल्भता वाढल्यानं आपसुकच बऱ्या-वाईट गोष्टींमधला फरक त्यांना कळेल. शिवाय आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यानं पुरुषांप्रमाणेच त्यांच्याही शब्दाला मान असेल. घरात फक्त पुरुषावरच घर चालवण्याचं दडपण येणार नाही.

दरम्यान, मुलींचं लग्नासाठीचं वय वाढवण्याला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी विरोध दर्शवला आहे. मुळात लग्नासाठी मुलामुलींच्या वयात अंतर असावं का हा संशोधनाचाच विषय आहे. भारतातला समाज पुरुषसत्ताक आहे. काही घरांमध्ये अजुनही स्रियांच्या शब्दाला किंमत नाही. त्यामुळे लग्न आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलीशी केलं, तर तिला नियंत्रणात ठेवलं जाऊ शकतं, ही मानसिकताही यामागे असू शकते. एकुणच समानतेच्या कितीही गप्पा मारल्या जात असतील तरीही हा अधिकार सर्वच स्त्रियांना मिळत असेल, असंही नाही.महिला सबलीकरणासाठी त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. लग्नाचं वय वाढल्यानं काहीअंशी हे शक्य होणार आहे. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’चे नारे देणं सोपं आहे. मात्र, ही प्रगती साध्य होत असताना पुरुषसत्ताक समाजाचा चष्मा काढून ठेवून खुल्या दिलानं ही समानता मान्य करणं गरजेचं आहे.

 – रेणुका शेरेकर