उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
WhatsApp Group

नाशिक:राज्यात उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.राज्‍य औद्योगिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. येथील हॉटेल ताज गेट वे मध्ये आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उद्योग क्षेत्रात पुरूषांसोबतच महिला उद्योजकांचा सहभाग वाढत आहे. महिला उद्योजकही औद्योगिक क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सवलती जाहीर केल्यामुळे उद्योगक्षेत्राची भरभराट होतांना दिसत आहे. नाशिकला उद्योगवाढीस भरपूर वाव असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी भविष्यात निर्माण होणार आहेत.  महाराष्ट्रहेदेशाचेग्रोथइंजिनआहे. उद्योगक्षेत्राच्यावाढीसाठीइन्फ्रास्ट्रक्चरमहत्वाचेआहे.

राज्य शासन उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी पूर्णपणे सकारात्मक आहे. राज्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या काही सूचना असल्यास त्‍या आपण शासनाकडे पाठवाव्यात. या सूचनांची शासनस्तरावर दखल घेण्यात येईल. उद्योजकांना पूर्णपणे संरक्षित केले पाहिजे, ही शासनाची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी योवळी सांगितले.

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक  : उपमुख्यमंत्री अजित पवार

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. त्या अनुषंगाने आपल्या राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. कोणत्याही राज्याची आर्थिक परिस्थिती ही त्या राज्यातील औद्योगिक विकास व रोजगार यावर अवलंबून असते. जे उद्योग उभे राहणार आहेत. त्यांना सवलती देवून आवश्यक अनुषंगिक परवानग्या दिल्या, तर नक्कीच ते भरभराटीला येतील यात शंका नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्योगमंत्री उदय सामंत प्रास्तविकात म्हणाले, चौदा वर्षांनंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 आज उद्योजकांना समर्पित करण्यात येत आहे. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर राहण्याची क्षमती या सर्वसमावेशक नियमावलीत आहे. सर्व क्षेत्रातील उद्योजकांच्या समन्वयाने ही नियमावली तयार करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योजकांची कार्यशाळा येथे घेण्यात आली. कार्यशाळेत सर्व स्तरातील उद्योजकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले आहे.

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबाबत माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन सोनाली मुळे यांनी केले.