एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी!

WhatsApp Group

मुंबई: महिला प्रवाशांना आजपासून (17 मार्च) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सर्व बसेसच्या भाड्यात 50 टक्के सवलत मिळणार आहे. एमएसआरटीसीने शुक्रवारी ही घोषणा केली. एमएसआरटीसीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार ही सवलत ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत दिली जात असून, राज्य सरकार महामंडळाला त्याची परतफेड करणार आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक परिवहन मंडळाच्या बसेसमधील सर्व महिला प्रवाशांना 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.

MSRTC 15,000 हून अधिक बस चालवते ज्यात 50 लाखांहून अधिक लोक दररोज प्रवास करतात. आता विविध सामाजिक गटांना भाड्यात 33 टक्के ते 100 टक्के सवलत देत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात 100 टक्के सवलत आणि 65 ते 74 वयोगटातील प्रवाशांना 50 टक्के सवलत जाहीर केली होती.

 

महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केली होती. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याचेही सांगण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारने आता अर्थसंकल्पाच्या दिवशी सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी सुरू केली आहे. सरकारच्या या पाऊलाचा राज्यातील महिलांना मोठा फायदा होणार आहे.