
मुंबई – मुंबईकरांसाठी (Mumbai) एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न (water problem) आता मिटला आहे. आता मुंबईमध्ये समुद्रातल्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन गोडे पाणी मिळवण्यात येणार आहे. मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरता 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेने (Mumbai Municipal Corporation) ‘सर्वांसाठी पाणी’ हे नवे धोरण जाहीर केलं आहे.
गोरेगाव पूर्व येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानात या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात येत आहे.
या प्रकल्पाद्वारे मुंबईतील जनतेला रोज समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून 200 दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे. मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज सुमारे 4,200 दशलक्ष लीटर असून सध्या होणारा पुरवठा 3,800 दशलक्ष लिटर आहे.
पालिकेच्या जलविभागामार्फत पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. दिवसामागे 25 ते 30 टक्के म्हणजे दररोज सुमारे 900 दशलक्ष लीटर पाण्याची चोरी, गळती होते. त्यामुळे आता मुंबईकरांना दररोज सुमारे 2,900 दशलक्ष लिटर एवढेच पाणी मिळतं. उर्वरित तूट भरून काढण्यासाठी पालिकेचं धोरण महत्त्वाचं ठरणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.