दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेलेली 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका यजमानांनी 2-1 ने जिंकली असली तरी मालिकेतील तिसर्या सामन्यात जोफ्रा आर्चरने सहा विकेट्स घेत जागतिक क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले. त्याची मॅचविनिंग कामगिरी पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला नक्कीच मोठा दिलासा मिळाला असेल.
या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यातील पराभवानंतर इंग्लंड संघावर क्लीन स्वीपचा धोका निर्माण झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने कर्णधार जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्या शतकी खेळीमुळे 346 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला जोफ्रा आर्चरच्या शानदार गोलंदाजीचा सामना करावा लागला.
मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 1 बळी घेतल्यानंतर जोफ्रा आर्चरला दुसऱ्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. यानंतर तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत जोफ्राने आपल्या जुन्या गोलंदाजीची धार सर्वांना दाखवून दिली. या सामन्यात जोफ्राने आपल्या गोलंदाजीत 9.1 षटकात एकूण 6 बळी घेतले. 6 विकेट्स घेतल्यानंतर जोफ्रा आर्चरने सांगितले की, खूप दिवसांनी पुनरागमन करणे सोपे नाही. ज्या क्षणापासून तुम्ही खेळायला सुरुवात करता, तेव्हापासून तुम्हाला असे दिसून येते की तुम्ही सतत सुधारत आहात.
आयपीएलच्या शेवटच्या हंगामात जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे खेळू शकला नाही आणि त्यानंतर आयपीएल 2023 हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स त्याच्या फिटनेसबद्दल खूप चिंतेत होते. मात्र, आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात जोफ्राने आपल्या शानदार गोलंदाजीने फिटनेस सिद्ध करण्यासोबतच मुंबई इंडियन्सला दिलासादायक बातमी दिली आहे.