नीरज चोप्राची पुन्हा सुवर्ण कामगिरी; 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करत मिळवलं पहिलं स्थान

WhatsApp Group

स्नायूंच्या ताणातून सावरल्यानंतर नीरज चोप्राने पुन्हा एकदा हातात भाला उचलून विक्रम केला आहे. त्याने प्रतिष्ठित डायमंड लीग मालिकेतील लुझने स्टेजमध्ये पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली आहे. नीरजने 87.66 मीटर फेक करून स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. त्याचवेळी जर्मनीचा ज्युलियन वेबर 87.03 मी.सह दुसऱ्या स्थानावर आहे. झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेचेने 86.143 मीटर फेक करून तिसरे स्थान पटकावले. भारतीय भालाफेकपटू नीरजचे या वर्षातील हे दुसरे सुवर्णपदक आहे. दोहा डायमंड लीगमध्येही तो सुवर्णपदक विजेता होता.

नीरज चोप्राने पहिल्या फेरीत फाऊलने सुरुवात केली. त्याच वेळी, जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 86.20 मीटर फेक करून आघाडी घेतली. पहिल्या फेरीअखेर नीरज पहिल्या तीन खेळाडूंमध्येही नव्हता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 83.52 मीटर फेक केला. मात्र, दुसऱ्या फेरीअखेरही ज्युलियन आघाडीवर होता. असे असतानाही नीरजच्या क्रमवारीत सुधारणा झाली आणि तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 85.02 मी. या थ्रोसह तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. मात्र, तरीही ज्युलियनने 86.20 मीटर फेक करून आघाडी कायम ठेवली. अशा स्थितीत नीरजने चौथ्या प्रयत्नात फाऊल केला. पाचव्या प्रयत्नात, नीरजच्या ‘गोल्डन आर्म’ने आपली जादू चालवली आणि 87.66 मीटरची थ्रो गाठली. यासह तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात नीरजने 84.15 मीटर फेक केला.

भारतीय भालाफेकपटू नीरजचे या वर्षातील हे दुसरे सुवर्णपदक आहे. दोहा डायमंड लीगमध्येही तो सुवर्णपदक विजेता होता. त्याचबरोबर नीरजचे हे 8 वे आंतरराष्ट्रीय सुवर्ण आहे. यापूर्वी त्याने आशियाई खेळ, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक खेळ आणि डायमंड लीग यांसारख्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

25 वर्षीय नीरजने 5 मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगचा ताण आला, ज्यामुळे त्याने 4 जून रोजी फॅनी ब्लँकर्स-कोएन गेम्स आणि 13 जून रोजी पावो नूरमी गेम्समधून माघार घ्यावी लागली. 29 मे रोजी एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. आता पूर्ण महिन्यानंतर तो पुन्हा स्पर्धेत उतरला. मात्र, या काळात त्याने कोणत्याही डायमंड लीगमध्ये खेळण्याची संधी सोडली नाही.