
पणजी – शिवसेना बंडखोर आमदारांचे वास्तव्य असलेल्या गोव्यातील (Goa) हॉटेलमधून तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. बनावट ओळखपत्रप्रकरणी ही अटक करण्यात आली आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान (Sonia Duhan) आणि त्यांच्यासह दोन कार्यकर्त्यांना शनिवारी दुपारी अटक करण्यात आली. बनावट ओळखपत्राच्या आधारे हॉटेलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची हॉटेलकडून तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पणजी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. दुहान यांनी हॉटेलमध्ये घुसून बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे बंडखोर आमदार शनिवारी रात्री मुंबईमध्ये परतले. गुवाहाटीमधून या आमदारांना गोव्यातील हॉटेलमध्ये नेण्यात आले होते. गुवाहाटीप्रमाणे गोव्यातही बंडखोर आमदारांसाठी सुरक्षा व्यवस्था तैनात होती.
सोनिया धुहान या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. वर्ष २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी या आमदारांची सुटका करण्यात सोनिया दुहान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे सोनिया धुहान यांनी गोव्यातही हाच प्रयत्न केला होता का, अशी चर्चा रंगली आहे.