नेदरलँडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 40 चेंडूत शतक झळकावून विश्वचषकात विक्रम केल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने न्यूझीलंडविरुद्धही झंझावाती खेळी करत विक्रमांची मालिका रचली. या सामन्यात त्याने 24 चेंडूत 41 धावा केल्या आणि विश्वचषक 2023 मधील सर्वात लांब षटकार ठोकला. त्याने भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला मागे टाकले. एवढेच नाही तर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा मॅक्सवेल आता पाचवा फलंदाज ठरला आहे. या डावात त्याने दोन षटकार ठोकले आणि तो रिकी पॉन्टिंगच्याही पुढे गेला आहे.
ग्लेन मॅक्सवेलने सर्वात लांब षटकार ठोकला
या डावात मॅकस्वेनने 104 मीटरचा गगनचुंबी षटकार मारला जो या स्पर्धेतील सर्वात लांब षटकारही होता. याआधी भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर अव्वल होता ज्याने 101 मीटरमध्ये षटकार ठोकला होता. या यादीत फक्त दोनच फलंदाज आहेत ज्यांनी 100 मीटरचा टप्पा पार केला आहे. तर इतर फलंदाज 98 मीटर किंवा 95 मीटरपर्यंत मर्यादित आहेत. टॉप 5 च्या यादीत ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज आणि भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा प्रत्येकी एक खेळाडू आहे.
View this post on Instagram
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
- 49-ख्रिस गेल
- 40- रोहित शर्मा
- 37- एबी डिव्हिलियर्स
- 36- डेव्हिड वॉर्नर
- 33- ग्लेन मॅक्सवेल
- 31- रिकी पाँटिंग
ऑस्ट्रेलियन संघ 49.2 षटकात 388 धावा करत सर्वबाद झाला. ट्रॅव्हिस हेडने विश्वचषक पदार्पणात झंझावाती शतक झळकावले. तर डेव्हिड वॉर्नरने 81 धावांची खेळी केली. शेवटी कर्णधार पॅट कमिन्सने 14 चेंडूत 37 धावा करत संघाची धावसंख्या 390 च्या जवळ नेली. ऑस्ट्रेलियन संघाने मागील सलग तीन सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने पहिले सलग चार सामने जिंकून भारताविरुद्धचा सामना गमावला होता. अशा स्थितीत आता किवी संघ विक्रमी 389 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकणार का हे पाहावे लागेल.