धोंडेगावात बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

WhatsApp Group

नाशिक – तालुक्यातील पश्चिम भागामध्ये बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. बुधवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास एका साडेसहा वर्षांच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला चढविला आहे. या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने बालिकेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले. गायत्री नवनाथ लिलके (रा. मूळ कोचरगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

कोचरगाव येथे राहणारी गायत्री काही दिवसांपूर्वी धोंडेगावामध्ये तिच्या मामाच्या घरी आली होती. रात्री घराबाहेर खेळत असताना बिबट्या अचानकपणे आला आणि तिच्यावर झडप टाकली. यावेळी ती प्रचंड घाबरली आणि बिबट्याने तिला जखमी केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी आजूबाजूच्या रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने गायत्रीला जबड्यातून सोडून देत धूम ठोकली. गिरणारे पंचक्रोशीतील हा पंधरवड्यात दुसरा हल्ला आहे. १० एप्रिल रोजी साडगाव रस्त्यावर सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका मजुरावर बिबट्याने हल्ला चढविला केला होता. सुदैवाने या हल्ल्यात तो मजूर बचावला.