कोकणात ‘कोंब्याची जत्रा’ अशी प्रसिद्ध असलेल्या 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुखच्या अनोख्या जत्रोत्सवाबद्धल माहीती आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या कोकणातील जत्रा सुरू झाल्या असून, सध्या कोकणी माणूस जत्रा करण्यात व्यस्त आहे. कोकणात सर्वात जास्त चर्चेत असणारी जत्रा ती म्हणजे कोंबड्याची जत्रा, ही जत्रा सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड या गावात भरते. या जत्रेचं वैशिष्ट म्हणजे या देवाच्या चाळयाला प्रसाद म्हणून कोंबडा आणि नारळ दिला जातो.
दक्षिण कोकणातील प्रसिद्ध असे हे जागृत देवस्थान आहे. कोकणच्या भूमीत आपल्याला विविध रूपात देव आढळून येतात. शिवाचं एक रूप म्हणजे मार्तंड खंडोबा कोकणात आपल्याला या मार्तंड देवाची मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकी एक मातोंड पेंडुर मधील श्री देव घोडेमुख देवस्थान, भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या मार्तंड देवाचे हे वस्ती स्थान आहे.
घोडेमुखचा जत्रोत्सव हा ”कोंब्याची जत्रा’ म्हणून ओळखला जातो. या जत्रेचा सोहळा डोळे भरून पाहावं असाचं असतो. हे मंदिर डोंगराच्या एका टोकावर वसलेलं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून 700-800 मीटर अंतरावर डोंगरात हे मंदिर आहे. भाविक मोठ्या प्रमाणात हा डोंगर चढून या देवाचं दर्शन घेतात. इतर जत्रेप्रमाणे इथे आपल्याला खाजं, मिठाई, नारळ, खेळण्याची दुकाने पाहायला मिळतात.
जाणून घ्या शिरशिंगे येथील मनोहर-मनसंतोष या ऐतिहासिक गडाचा इतिहास
सर्वात महत्वाचे म्हणजे हे देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान म्हणून ओळखलं जातं. या देवाची ख्याती सर्वदूर पसरली असून या देवाला शरीराच्या कोणत्याही अवयवाच रूप नसताना देखील या देवाला नवस बोलला जातो, आपल्याला काही दुखणं असेल तर त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृति तयार करून घोडेमुख देवाला वाहिली जाते आणि नवस बोलला जातो. त्यानंतर आपलं दुखण बर होतं असा तेथील भक्तांचा समज आहे. या जत्रोत्सवाला मुंबई, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक, या भागातिल भाविक या जत्रेला उपस्तीत असतात. जत्रेच्या दिवशी सर्व गावकर मंडळी सातेरी मंदिरातून देवस्वाऱ्या घेऊन घोडेमुख मंदिराकडे जातात. सुमारे 10 किलो मिटर पायपीठ केल्यानंतर या जत्रोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.
डोंगर चढून मंदिरात गेल्यानंतर सालाबाद प्रमाणे होणाऱ्या विधी गावकऱ्यांकडून पूर्ण केल्या जातात. गावकरी आणि इतर मांनकऱ्यांचा कोंबड्यांचा मान येथील चाळयांना दिला जातो. त्यानंतर भाविकांनी आणलेल्या सुमारे दहा ते पंधरा हजार कोंबड्यांचा बळी या चाळयांना दिला जातो. म्हणूनच ही जत्रा ‘कोंब्याची जत्रा’ म्हणून ओळखली जाते. मातोंड आणि पेंडुर गावच्या इतिहासात या देवस्थानाला मोठं महत्व आहे.