गाझीपूरमध्ये अनोखा विवाह सोहळा! मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी मांडला संसार; अग्निसाक्षीने घेतले सात फेरे, ‘वेडिंग कार्ड’ सोशल मीडियावर व्हायरल
गाझीपूर: उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून जातीय सलोखा आणि प्रेमाचे एक वेगळेच उदाहरण समोर आले आहे. करीमुद्दीनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका मुस्लिम तरुणीने हिंदू युवकासोबत सनातन परंपरेनुसार विवाह केला आहे. या लग्नाची विशेष चर्चा होण्याचे कारण म्हणजे, मुलीच्या कुटुंबीयांनी केवळ या लग्नाला संमतीच दिली नाही, तर हिंदू रीतिरिवाजानुसार पत्रिका छापून हा सोहळा उत्साहात पार पाडला. सध्या या विवाहाचे वेडिंग कार्ड आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सनातन परंपरेने संपन्न झाला विवाह
विशंभरपूर येथील चंचल कुमार गोंड आणि अंजू (बदलेले नाव) यांचा विवाह लठ्ठूडीह येथील एका मंगल कार्यालयात संपन्न झाला. या लग्नात मुस्लिम तरुणीने स्वतःच्या इच्छेने सनातन धर्म स्वीकारून वैदिक मंत्रोच्चारात अग्निच्या साक्षीने सात फेरे घेतले. लग्नाचे जे कार्ड छापण्यात आले होते, त्यावर मुलीचे नाव ‘अंजू’ असे लिहिले होते, तर पित्याच्या जागी निजामुद्दीन अन्सारी आणि मातेच्या जागी नूरजहाँ यांचे नाव होते. सिंदूरदान आणि मंगळसूत्राच्या विधीवेळी वधू-वरांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.
लव्ह-इन रिलेशनशिप आणि मुलाला सामाजिक मान्यता
मिळालेल्या माहितीनुसार, चंचल आणि अंजू गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि त्यांना एक लहान मुलगा देखील आहे. काही काळापूर्वी त्यांनी घरातून पळ काढला होता. मात्र, आता आपल्या नात्याला आणि मुलाला समाजात कायदेशीर व सामाजिक मान्यता मिळावी, यासाठी दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन हा विवाह सोहळा घडवून आणला. मुलीच्या आईने आणि भावाने या लग्नाला पूर्ण पाठिंबा दिला असून, ते आता आपल्या मुलीला नियमित भेटत असल्याचेही समोर आले आहे.
हिंदू संघटनांचा पुढाकार आणि आशीर्वाद
या विवाह सोहळ्याचे साक्षीदार केवळ गावकरीच नव्हते, तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनीही या लग्नाला उपस्थिती लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. कोणताही वाद न होता, शांततेत आणि धार्मिक परंपरेने हा सोहळा पार पडावा यासाठी या संघटनांनी विशेष प्रयत्न केले. स्थानिक नागरिक या विवाहाकडे सामाजिक सौहार्दाचे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहत आहेत.
स्वतंत्र संसाराची थाटली नवीन वेल
मुलाचे वडील हरिशंकर गोंड यांनी सांगितले की, मुलगा आणि सून आता आपल्या मुलासह एका भाड्याच्या घरात आपला स्वतंत्र संसार करत आहेत. मुलीच्या घरच्यांनाही आता या नात्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. अंजूनेही आनंदाने हिंदू संस्कृतीचे पालन करण्याचे मान्य केले असून, संपूर्ण परिसरात या धाडसी आणि प्रेमळ निर्णयाचे कौतुक होत आहे.
