विवाहितांसाठी आनंदाची बातमी! आता या अॅपच्या मदतीने घरबसल्या मिनिटांत मिळवा विवाह प्रमाणपत्र

WhatsApp Group

मुंबईकरांसाठी बीएमसीने आणखी एक ऑनलाइन सुविधा आणली आहे. मुंबईतील लोक आता डिजीलॉकरवर त्यांचे विवाह प्रमाणपत्र ऑनलाइन जतन करू शकतात. ही सुविधा सध्या 28 जानेवारी 2016 नंतर लग्न झालेल्यांसाठीच उपलब्ध आहे. 28 मार्चपर्यंत मुंबईत 3,80,494 विवाहांची ऑनलाइन नोंदणी झाल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.

कोणाला मिळणार?
लोकांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी व्हिसा, पासपोर्ट आणि इतर अनेक महत्त्वाची सरकारी कागदपत्रे लागतात. अशा परिस्थितीत विवाहित व्यक्तींनाही काही वेळा त्यांच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राची गरज भासते. यासाठी बीएमसीने आता मुंबईकरांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही आता घरबसल्या तुमच्या मोबाईलमध्ये लग्न नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन सेव्ह करू शकता. बीएमसीने 2010 पासून विवाह नोंदणीची सुविधा सुरू केली आहे. जानेवारी २०१६ पासून ही सुविधा ऑनलाइनही सुरू करण्यात आली आहे. आता एक पाऊल पुढे टाकत BMC ने DigiLocker मोबाईल अॅपवर विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील उपलब्ध करून दिले आहे.

डिजीलॉकरवर विवाह प्रमाणपत्र सुविधा सुरू झाल्यानंतर, नागरिकांना हार्ड कॉपीच्या स्वरूपात विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इकडे-तिकडे जावे लागणार नाही. हे प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणीनंतरच वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिले जाईल. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी संचालक माहिती तंत्रज्ञान शरद भोके, व्यवस्थापक मीनल शेट्ये, डेनिस फर्नांडिस उपस्थित होते.