Viral video German tourist: इंडियाचा जलवा! जर्मन पर्यटक झाला सरकारी रुग्णालयाचा फॅन; पाहा व्हायरल व्हिडिओ
भारतातील आरोग्य व्यवस्था आणि ‘मेडिकल टुरिझम’ सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच एका जर्मन पर्यटकाचा अनुभव सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्याने भारतीय सरकारी रुग्णालयातील सुविधेचे तोंडभरून कौतुक केले आहे. अमेरिका आणि युरोपमधील महागड्या उपचारांच्या तुलनेत भारतात केवळ ६० ते ८० टक्के कमी खर्चात जागतिक दर्जाच्या सुविधा मिळत असल्याने, परदेशी पर्यटकांचा कल भारताकडे वेगाने वाढत आहे.
जर्मन पर्यटकाचा ‘सुरत’मधील अविस्मरणीय अनुभव
डेव्हिड नेबेल नावाचा हा जर्मन पर्यटक भारतात फिरण्यासाठी आला असताना त्याला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. रेबीजचा धोका टाळण्यासाठी त्याला तातडीने उपचारांची गरज होती. अशा परिस्थितीत त्याने गुजरातच्या सुरत शहरातील एका सरकारी रुग्णालयात धाव घेतली. तेथील अनुभव शेअर करताना डेव्हिडने सांगितले की, सरकारी रुग्णालयातील स्वच्छता आणि तत्परता पाहून तो थक्क झाला. विशेष म्हणजे, एका विदेशी नागरिकाला कोणतेही शुल्क न आकारता पूर्णपणे मोफत उपचार मिळाले, ही गोष्ट त्याच्यासाठी सर्वात मोठी आश्चर्याची ठरली.
View this post on Instagram
जर्मनीच्या तुलनेत भारताची सेवा ठरली सरस
डेव्हिडने ‘इंडो-जर्मन व्हायब्स’ या इन्स्टाग्राम पेजवर आपला व्हिडिओ शेअर करत सांगितले की, जर्मनीमध्ये एखाद्या विदेशी नागरिकाला अशा प्रकारे मोफत उपचार मिळणे अशक्य आहे. “मला चार इंजेक्शन देण्यात आले आणि डॉक्टरांनी अतिशय पद्धतशीरपणे पुढील काळजी कशी घ्यावी हे समजावून सांगितले. येथील सेवा इतकी वेगवान आणि विनामूल्य असेल याची मला कल्पनाही नव्हती,” अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओमुळे भारतीय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची एक सकारात्मक प्रतिमा जागतिक स्तरावर पोहोचली आहे.
मेडिकल टुरिझमचे जागतिक केंद्र बनतोय भारत
पाश्चात्य देशांमध्ये उपचारांसाठी जिथे मोठी वेटिंग लिस्ट असते, तिथे भारतात कर्करोग, हृदयरोग, अस्थिरोग आणि फर्टिलिटी यांसारख्या गंभीर आजारांवर त्वरित उपचार मिळतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवामुळे भारत आता केवळ उपचारांचे ठिकाण न राहता एक ‘ग्लोबल मेडिकल हब’ म्हणून उदयास येत आहे. कमी खर्चात जागतिक दर्जाची सेवा मिळत असल्याने मेडिकल टुरिझम क्षेत्रात भारताची पकड अधिक मजबूत होत चालली आहे.
