
विराट कोहलीला खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी मी मदत करण्यास तयार आहे असं भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले आहेत. गावस्कर म्हणाले की, विराटच्या खराब फॉर्ममागचे कारण मला माहीत आहे. माझा सल्ला कोहलीला पुन्हा फॉर्म मिळवण्यात मदत करू शकतो.
इंग्लंडविरुद्ध भारताने 2-1 ने मालिका जिंकल्यानंतर इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, विराट कोहलीशी चर्चा करण्यासाठी मला फक्त 20 मिनिटांची गरज आहे. या फलंदाजाच्या खराब फॉर्मचे कारण काय आहे? याबाबत मला कोहलीशी चर्चा करायची आहे. त्याच्या फॉर्ममध्ये परत येण्याची चिंता त्याच्यासाठी परिस्थिती आणखी वाईट करत आहे. जर माझ्याकडे त्याच्याशी संवाद साधण्यासाठी 20 मिनिटे असतील तर मी त्याला काय करावे हे सांगू शकलो असतो.
विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. कसोटी स्पेशालिस्ट मानला जात असला तरी विराटला दोन डावात केवळ 31 धावा करता आल्या. टी-20 मालिकेतही तो त्याच स्थितीत राहिला आणि दोन सामन्यांत त्याला केवळ 12 धावा करता आल्या. कोहली वनडे मालिकेत मोठी खेळी खेळेल अशी अपेक्षा होती. मात्र या स्टार फलंदाजाला दोन डावात केवळ 33 धावाच करता आल्या. कोहलीला दोन वर्षांहून अधिक काळ शतक झळकावता आलेले नाही आणि ही प्रतीक्षा आता वाढली आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर कोहली जवळपास महिनाभराच्या विश्रांतीवर आहे.