
सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे मांजरधारा येथील जंगलामध्ये गवा रेडा जखमी अवस्थेत ग्रामस्थांच्या दृष्टीस पडल्यामुळे येथील संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी गवा रेडा जंगलातून बाहेर लोकवस्तीत आल्यास कोणाला तरी इजा करेल या भितीने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली असून वनकर्मचारी वनपाल प्रमोद सावंत, वनरक्षक महादेव गेजगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनकर्मचाऱ्यांनी जंगलामध्ये शोधाशोध केली असता त्यांना हा गवा रेडा दृष्टीस पडला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याला चालताही येत नाहीय तसेच तो रौद्ररूप धारण करतो यामुळे वनविभाग त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. जखमी गवा जंगलात ठिकठिकाणी बसून असतो. पण गवा वस्तीनजीक आल्यास ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे.