मुकेश अंबानींना मागे सारत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

WhatsApp Group

मुंबई – अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी (Gautam Adani) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मिळालेल्या माहितीनूसार अदानी ग्रुपचे मार्केट कॅप रिलायन्सपेक्षा आता जास्त झाले आहे.

यापूर्वी, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सुमारे 88.8 अब्ज डॉलर होती. तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 91 अब्ज डॉलर होती. मात्र आता गौतम अदानी यांच्या संपत्तीत 55 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. तर मुकेश अंबानी यांनी आपल्या संपत्तीमध्ये14.3 अब्ज डॉलर्सची भर घातली आहे. मुकेश अंबानी हे दीर्घकाळ आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र आता श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांनी पहिला क्रमांक पटकावला असून मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मोठा धक्का दिला आहे.

रिलायन्सच्या समभागात सलग तिसऱ्या दिवशी घसरण सुरूच आहे. या दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज 1.44 टक्क्यांनी घसरून 2351.40 रुपयांवर बंद झाला. त्या तुलनेत अदानी समूहाच्या सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स प्रचंड वाढले. अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन यांनी चांगला व्यवसाय केला. अदानी समूहाच्या 6 कंपन्या शेअर बाजारात आहेत. या तीन कंपन्यांव्यतिरिक्त अदानी ग्रीन, अडवी पॉवर आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांचाही समावेश आहे.

अदानी समूह आपली सातव्या कंपनीचा IPO लवकरच लाँच करण्याचा विचार करत आहे. गेल्या तीन आठवड्यांत अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स झपाट्याने वाढले आहेत. त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स जून 2021 पासून आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी हे भारतातील सर्वात मोठे थर्मल कोळसा उत्पादक आणि कोळसा व्यापारी आहेत.

येणाऱ्या काळात या दोन्ही भारतीय उद्योगपतींमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळेल यात काही शंका नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गौतम अदानी यांनी भारतीय उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.