५० खोक्यांसाठी एक लाख मराठी तरुणांचा रोजगार पळवणाऱ्या ५० गद्दारांना जनता कधीही माफ करणार नाही; गौरीशंकर खोत

WhatsApp Group
कणकवली : शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांची कणकवली येथे पत्रकार परिषद झाली यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टिका केली आहे.ते म्हणाले, वेदांता-फॉक्सकॉन या प्रकल्पात सुमारे दीड लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाख कुटुंबांना रोजगार देण्याची क्षमता होती. त्यामुळे एक लाख मराठी कुटुंबांना त्यावर उदरनिर्वाह करता आला असता. एवढ्या प्रचंड प्रमाणात रोजगारनिर्मितीची क्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटून गुजरातमध्ये जाणे हे एकंदरीतच मराठी माणसाचे दुर्दैव आहे. त्या गोष्टीकडे प्रत्येकानेच राजकारणापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे.

५० खोके देऊन आमदारांची खरेदी करून चांगल्या पद्धतीने काम करत असलेले सरकार अस्थिर केल्यानंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रगतीवर किती दूरगामी परिणाम होऊ शकतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. ज्या सरकारचे भवितव्य सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर लटकले आहे असे अस्थिर सरकार असलेल्या राज्यात कोणताही मोठा गुंतवणूकदार प्रकल्प उभारण्यासाठी धजावत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ५० गद्दारांनी ५० खोके घेऊन महाविकास आघाडी सरकार पाडले आणि त्यामुळे एक लाख मराठी कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला. किंबहुना एवढी मोठी गुंतवणूक आणि रोजगार देण्याची क्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेण्यासाठीच गद्दार आमदारांना हाताशी धरून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले आणि त्यासाठी दोन-अडीच हजार कोटी रुपयांची उधळपट्टी केली गेली. ५० खोक्यांच्या आमिषापायी बेरोजगार तरुणांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या ५० गद्दारांना महाराष्ट्राची सुज्ञ जनता कधीही माफ करणार नाही.

जेव्हा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी बैठका घेण्याची गरज होती, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश मंडळाना भेटी देत होते. जर मुख्यमंत्री गणेश मंडळांना भेटी देत फिरत असतील तर राज्यातील प्रशासनाचा गाडा हाकण्यासाठी व महत्वाच्या बैठका पार पाडण्यासाठी महाराष्ट्राला स्वतंत्र मुख्यमंत्र्याची तरतूद करावी लागेल. गणेशोत्सवाअगोदर दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा करण्यात मुख्यमंत्री व्यस्त होते. अगदी गोविंदांची खुशमस्करी करण्यासाठी त्यांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली. भविष्यात महाराष्ट्रातील खाजगी उद्योगांमध्ये गोविंदांना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली तर कुणालाही आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे अशा मुख्यमंत्र्याच्या राज्यात कोणत्याही खाजगी कंपनीला गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य राहणार नाही. कोणत्याही राज्यात उद्योग आणायचे असतील तर मुळात राज्यातील वातावरण उद्योगप्रिय बनवावे लागते. सगळे सण, उत्सव दणक्यात साजरे करूया… रोजगाराचं पाहू पुढे… अशी मानसिकता असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभल्यामुळे तर राज्याचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल नाही. फॉक्सकॉन पाठोपाठ महाविकास आघाडीकडून मंजूर करण्यात आलेला आणि ७५ हजार रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेला ‘बल्क ड्रग पार्क’ प्रोजेक्टही गुजरातला हलवला गेला आहे. अगोदरच देशातील बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना शिंदे सरकारच्या कार्यकाळात रोजगार देण्याची क्षमता असलेले दोन्ही मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने मराठी तरुण अक्षरशः देशोधडीला लागणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत पहाटेचे तीन दिवसांचे सरकार बनवले तेव्हा महाराष्ट्रा राज्याचा हक्काचा चाळीस हजार कोटींचा निधी केंद्राला परत दिला होता. भाजपचा महाराष्ट्रद्वेष्टेपणा लपून राहिलेला नाही. भाजपचे नेते महाराष्ट्रात राहून गुजराती लोकांसाठी काम करतात हे एव्हाना उघड झाले आहे. आता त्यात एकनाथ शिंदे आणि चाळीस गद्दारांची भर पडली आहे. “मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही” असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी महिनाभरापूर्वी केले होते. त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा…? महाराष्ट्रात राहून गुजराती लोकांची भलावण करायची यांची हिंमत होते कारण आपल्यातलेच काहीजण गद्दारी करून मराठी माणसाची ताकद कमी करण्याचा घृणास्पद प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘हिंदू गर्व गर्जना यात्रे’ची घोषणा केली आहे आणि ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही त्यांची घोषणा आहे. खर तर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला आंदण दिल्यानंतर ‘गर्व से कहो हम गुज्जू है’ अशी घोषणा त्यांनी द्यायला हवी. एकनाथ शिंदे पैठणच्या जाहीर सभेत सांगतात की आम्ही मोदी-शहांचे हस्तक आहोत आणि दुसऱ्या दिवशी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जातो. महाराष्ट्रातील जनतेने याचा नेमका अर्थ काय घ्यायचा…? खोके घेऊन गद्दार झालेले सर्वच आमदार हे गुजरात्यांचे दलाल बनले आहेत. सद्यस्थितीत बाकी त्यांची कुठलीही ओळख शिल्लक राहिलेली नाही.

फार पूर्वीपासून मुंबईवर गुजरात्यांचा डोळा आहे. मोरारजी देसाईंपासून अनेकांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे नापाक मनसुबे उराशी बाळगले. मुंबईसह मराठी भाषिकांचे एकसंध राज्य निर्माण व्हावे म्हणुन संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला आणि त्यात चिंतामणराव देशमुखांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या राजीनाम्याची समिधा पडल्यावरच हा लढा खऱ्या अर्थाने पेटला. दिनांक २५ जुलै १९५६ रोजी चिंतामणराव देशमुखांनी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा देताना संसदेत भाषण केले होते की, “ज्या प्रांतातील व मतदारसंघातील लोकांनी मला निवडुन दिले, त्यांच्या भावनांची कदर करणे हे माझे कर्तव्य आहे, म्हणुन मी हे केंद्रीय मंत्रीपद सोडतो.” पंतप्रधान नेहरूंनी महाराष्ट्रासंबंधीचा निर्णय हा कँबिनेटच्या सल्ल्याने घेतला नाही या सी.डी.देशमुखांनी घेतलेल्या आक्षेपामुळे पंतप्रधान हा सरकारचा केंद्रबिंदू आहे व त्याने असे निर्णय घेणे अपरिहार्य आहे असा खुलासा नेहरूंना संसदेत करावा लागला. मुंबईतील गोळीबारात १०५ हुतात्मे झाले त्याची चौकशी करण्यास केंद्रीय गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी नकार दिला हे कारणही त्यांनी राजीनाम्यासाठी दिले. अरेरावी व बेकायदेशीर पद्धतीने केंद्रीय मंत्रीमंडळात निर्णय घेतले जातात असे आपल्या निवेदनात नमुद करून त्यांनी पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री या दोघांवरही तोफ डागली. मुंबईतील इतक्या मोठ्या गोळीबाराची साधी चौकशी होत नाही, याबद्दल कडक शब्दात निषेध नोंदवून सत्तारूढ पक्षाच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस आहे, असे लोकसभेत पंतप्रधान नेहरूंच्या तोंडावर ठणकावून सांगितले. पुढे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्यात १०५ हूतात्म्याइतकेच चिंतामणराव देशमुखांचे केंद्रीय मंत्रीपदाचे बलिदान देखील तितकेच महत्वाचे ठरले. ज्या पंतप्रधान नेहरूंनी त्यांना देशाचे अर्थमंत्री केले त्यांची सुद्धा पर्वा त्यांनी कधीही केली नाही व शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या मातीशी आपले इमान राखत त्यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा नेहरूंच्या तोंडावर भिरकावून मारला. आज चिंतामणराव देशमुखांनी राखलेला इमान आणि महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे दाखवलेले धारिष्ट्य एकनाथ शिंदे दाखवणार आहेत का…? त्यासाठी संबंधित नेत्याकडे नैतिक सामर्थ्य असावे लागते आणि गद्दारांकडे ते कधीच नसते. एकनाथ शिंदेंनी सर्वप्रथम शिवसेनेशी गद्दारी केली आणि आता ते संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी करत आहेत. भाजपाला मुंबई महानगरपालिका गिळंकृत करून गुजरात्यांना सुपूर्त करायची आहे. त्यासाठीच मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी दिल्लीतील सगळी ताकद पणाला लावली आहे आणि या षडयंत्रात त्यांना गद्दार शिंदे गट मदत करत आहे. मुंबई महाराष्ट्रापासून अलग करण्याचे भाजपचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नाही कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक शरीरात शेवटचा श्वास शिल्लक असेपर्यंत अखंड महाराष्ट्र आणि मुंबईसाठी प्राणपणाने लढत राहील. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी दिलेले बलिदान कधीही वाया जाणार नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला देण्याचा डाव मुंबईतील सुज्ञ जनता बीएमसी निवडणुकीत हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.

नारायण राणेंनी शिवसैनिकांना मुंबईत फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, असे वक्तव्य केले. एखाद्या बंदुकीचा चाप ओढण्यापूर्वी आपण त्यात गोळ्या शिल्लक आहेत की नाहीत याची खातरजमा करावी लागते. नारायण राणे गोळ्या संपलेल्या बंदुकीचा चाप ओढत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग चार वेळा पराभव करून शिवसेनेने त्यांच्या बंदुकीतल्या गोळ्या केव्हाच काढून घेतल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या वायफळ बडबडीला काडीचीही किंमत नाही. नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र काळा कोट घातलेल्या बॉडीगार्डच्या दोन बोलेरो गाड्या आपल्या गाडीच्या मागे-पुढे लावून संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राणेसमर्थकांनी काळोखात माझ्या गाडीवर दगडफेक केली तरी माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक कधीही बॉडीगार्ड घेऊन जिल्ह्यात फिरला नाही. मात्र शिवसैनिकांना आव्हान देणारे नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र जीवाच्या भीतीने बॉडीगार्ड सोबत घेऊन फिरत आहेत. हा सर्वात मोठा विरोधाभास म्हणावा लागेल. माझे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना एकच आवाहन आहे की त्यांनी व त्यांच्या मुलांनी किमान महिनाभर बॉडीगार्डशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात फिरावे आणि नंतरच शिवसैनिकांना आव्हान द्यावे.