कोकणातील गणेशोत्सव

WhatsApp Group

गावातील गणेशोस्तव म्हणजे जणू भक्ती, चैतन्य, आनंद आणि उत्साहाला उधाणच. गणेशोत्सव म्हटला की अवघ्या कोकणी माणसाला आपल्या गावाकडील गणपती आठवल्याशिवाय राहत नाही. मग ते गाव खेडे कोकणातील कोणतेही असो. ज्याचे बालपण कोकणात गेले असेल आणि या उत्सवाच्या वेळी ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी त्याचे पाय गावच्या गणपतीकडे आपोआप वळतात आणि सर्व चाकरमानी कोकणाची वाट धरतात. कोकणातल्या प्रत्येक गावातील गणेशोस्तव म्हणजे सारा गावच मोरया च्या भक्तीत तल्लीन होउन जातो.

मुंबईतील चाकरमानी गणेश चतुर्थीच्या अगोदर साधारणत: 2-3 दिवस गावाकडे येतात. गणपती बसवण्याच्या जागेवर विविध प्रकारचे डेकोरेशन केले जाते. आपले डेकोरेशन इतरांपेक्षा सुंदर कसे दिसणार याचा विचार सारे जण करतात. बघता बघता 2 दिवस निघून जातात अन गणपतींचे आगमन वाजत गाजत होते. घरोघरी आपापल्या परंपरेनुसार  पाच, सात अथवा दहा दिवस गणपती बसवतात. गावात वेगवेगळ्या वाड्या असतात. काही ठिकाणी 5 ते 6 घरांची एक वाडी असते तर काही वाड्या 30 ते 35 घरांच्या असतात अन प्रत्येकाकडे गणपती असतो.कोकणात सार्वजनिक वा घरगुती गणपतींचे आगमन हा एक जल्लोषच असतो. अनेक गावांतून, गावांतील 40-50 कुटुंबीयांचे गणपती एकत्रित डोक्यावरून वाहून नेतात. गावांतील लोक, महिला, लहान मुलं गुलाल उधळत, वाजत-गाजत बाप्पाचे स्वागत करतात, हा देखावा अगदी नजरेत भरण्यासारखा असतो. यातून कोकणातील संघटित उत्सवाचे स्वरूप लक्षात येते.

बाप्पाच्या आगमनानंतर सगळीकडेच आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पसरले असते. या वेळी गावात राहणारे तसेच शहरातून येणारे सर्व जुने मित्र भेटतात. गावातील निसर्गाचे वेगळे रूप यावेळी पाहायला मिळते. शेतीची कामं आता थोडी कमी झालेली असतात, पावसाचा जोर ओसरलेला असतो. भातशेती चहुबाजूनी बहरलेली असते. सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. तो शेतीचा सुगंध वेगळाच आनंद देतो. रंगीबेरंगी रानफुलांनी धरणी सजलेली असते. वाऱ्याच्या झोक्यावर डुलणारी हिरवी शेतं मखमलीचा भास निर्माण करीत असतात. नदीतील पाणी कमी झालेले असते. त्यामुळे या दिवसांत मित्रांसोबत मनोसोक्त पोहायला मिळते. शेतातील कोवळ्या काकड्या खायला मिळतात. त्या गावठी काकड्यांची मजा काही वेगळीच असते. लहानपणी चोरून खाल्लेल्या काकड्याची आठवण प्रत्येकाला होते. सारे मित्र भेटल्यावर तर लहानपणीच्या आठवणींमध्ये रमून जातात. वाड्या- वाड्यांमध्ये मित्रांच्या गप्पांचे अगदी फड रंगतात.

रोज सकाळी उठल्यावर पूजेसाठी रानफुले आणि गणपती साठी दूर्वा आणणे,नदीवर अंघोळीला जाणे. मनसोक्त डुंबून झाल्यावर घरी परतणे. दुपारी मित्रांच्या घरी गप्पा. रात्री कोणाच्या घरी कोणता कार्यक्रम करायचा याची आधीच आखणी केली जाते. त्यानंतर मस्त चुलीवरचे खमंग जेवण. त्या जेवणाची मजा शहरातील जेवणापेक्षा खूपच वेगळी असते. यावेळी गावातली सर्व घरं सदोदीत सगळ्यांसाठी उघडीच असतात. या दिवसात कुणाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते. सगळ्या गावाचं एक मोठ्ठं कुटुंबच एकत्र नांदत असतं. संध्याकाळ झाली की प्रत्येकाच्या घरी आपापल्या वाड्यांमध्ये ढोलकीच्या गजरात आरत्या करतात. या आरत्यांच्यावेळी घरातील महिला मंडळी देखील उत्साहाने भाग घेतात. आरती झाल्यावर प्रत्येकाच्या घरातून प्रसाद म्हणून कडक बुंदीचे लाडू, फरसाण आणि मिळणारा गावरान मेवा काकडी, टरबूज, केळी फस्त करतात. रात्री जेवण झाल्यावर उत्सवाला खरी रंगत येते. काही वाड्या मधे भजनांच्या मैफिली होतात. कोकणात प्रत्येक वाडीवर भजनी मंडळ असतं. गण, स्तवन, अभंग, गवळण, कव्वाली, भारुड आणि शेवटचा गजर असं भजनाचं रूपडं असत. गावकऱ्यांच्या सोबतीने आणि टाळ-मृदंगाच्या साथीने भजन भक्ती ही कोकणची खासियत आहे. गणेशोत्सवात भजनांना अधिकच रंग चढतो.

काही जणांच्या घरी गौरी पूजनही केले जाते. गौरी आणल्या जातात. साधारण गणेश चतुर्थीच्या नंतर दोन दिवसांनी गौरी बसवल्या जातात. त्यांना नटवले जाते. नव्याने लग्न झालेल्या माहेरवाशिणी गौरी पूजनाला माहेरी येतात. त्यानंतर मात्र सर्वत्र आनंदमय वातावरण असते. या दिवसांत उकडीच्या मोदकांचा सुगंध सर्वत्र पसरलेला असतो.

बघता बघता गणपती विसर्जनाचा दिवस कधी येतो कळतच नाही. गणपती विसर्जन हा डोळ्यांत पाणी आणणारा प्रसंग असतो. मुलगी सासरी जाताना जी भावना निर्माण होते, तशीच अवस्था विसर्जनाच्या वेळी होते. आठ-दहा दिवस आनंदात घालवलेल्या लहान तर अक्षरश: अश्रू आवरेनासे होते. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ हा संदेश गजाननाबरोबर नातेवाईकांनाही देत हा आनंद सोहळा संपतो. शेवटी उदास अंतःकरणाने, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत गणरायाला निरोप देऊन नदीमध्ये गणपती विसर्जन केले जाते. आणि भारावलेल्या अंतकरणाने, जड पावलांनी हातावर प्रसाद घेऊन गावकरी मंडळी घराकडे वळतात. ‘गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’ म्हणणारा मुंबईकर चाकरमानीही पुन्हा एकदा गावाला राम राम करून मुंबईकडे वळतो तो वर्षभराची ऊर्जा घेऊनच.