इंदूरनंतर आता गांधीनगरमध्ये ‘विषारी’ पाण्याचा विळखा! 104 रुग्ण रुग्णालयात दाखल; आरोग्य यंत्रणेची धावपळ
गांधीनगर: मध्य प्रदेशातील इंदूरनंतर आता गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये दूषित पाण्यामुळे टायफॉइडचा (Typhoid) मोठा उद्रेक झाला आहे. शहरातील विविध भागांतून आतापर्यंत १०४ संशयित रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, यात लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पिण्याचे पाणी असुरक्षित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याने महापालिकेने अनेक भागांत हायअलर्ट जारी केला आहे.
लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम; उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडून पाहणी
गेल्या तीन दिवसांत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः बालरोग विभागात लहान मुलांची गर्दी वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन आणि इतर आवश्यक सुविधांची चणचण भासू नये, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच, रुग्णांच्या उपचारासाठी २२ तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांची परिस्थितीवर नजर
गांधीनगर हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा लोकसभा मतदारसंघ असल्याने त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अमित शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी तीन वेळा फोनवरून संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला. बाधितांना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती त्यांनी घेतली. केंद्राकडूनही या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
पाणी नमुन्यात धक्कादायक खुलासा; उपाययोजना युद्धपातळीवर
सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीता पारिख यांनी सांगितले की, सेक्टर २४, २५, २६, २८ आणि आदिवाडा परिसरातून सर्वाधिक रुग्ण येत आहेत. या भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले असता, ते पाणी पिण्यासाठी सुरक्षित नसल्याचे प्रयोगशाळेतील अहवालात समोर आले आहे. यानंतर महापालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले असून क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप केले जात आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि बाहेरील खाद्यपदार्थ टाळावेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
