गडचिरोलीत प्रशासकीय अनास्थेचा बळी! रस्ता नसल्याने गरोदर मातेची 6 किमी पायपीट; बाळासह मातेचाही करुण अंत

WhatsApp Group

गडचिरोली: “रस्ते विकासाची गंगा घराघरात पोहोचली” असे दावे केले जात असतानाच, दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात एक भीषण वास्तव समोर आले आहे. आलदंडी टोला येथील २४ वर्षीय आशा सेविका संतोषी किरंगा यांना प्रसव कळा सुरू असताना रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. परिणामी, ६ किलोमीटर जंगलातून पायपीट करावी लागल्याने त्यांना आणि त्यांच्या बाळाला प्राण गमवावे लागले आहेत.

नेमकी घटना काय?

संतोषी किरंगा या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. १ जानेवारी रोजी त्यांना प्रसव कळा जाणवू लागल्या. मात्र, त्यांचे गाव मुख्य रस्त्यापासून पूर्णपणे तुटलेले असून तिथे जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नाही. नाईलाजास्तव, संतोषी यांनी आपल्या पतीसोबत जंगलाच्या वाटेने ६ किलोमीटर पायपीट करत आपल्या बहिणीचे घर गाठण्याचा प्रयत्न केला. या प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती कमालीची बिघडली.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू

२ जानेवारी रोजी सकाळी संतोषी यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना रुग्णवाहिकेद्वारे हेदरी येथील काली अम्माल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, ६ किलोमीटरच्या पायपिटीचा ताण शरीराला सहन झाला नाही. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया (Operation) करण्याचा निर्णय घेतला, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गर्भाशयातच बाळाचा मृत्यू झाला होता. वाढलेल्या रक्तदाबामुळे (Blood Pressure) काही वेळातच संतोषी यांनीही अखेरचा श्वास घेतला.

आशा सेविकाच ठरली आरोग्य व्यवस्थेची बळी

विशेष म्हणजे, संतोषी किरंगा स्वतः एक ‘आशा सेविका’ म्हणून आरोग्य सेवा देत होत्या. दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या महिलेला स्वतःच्या प्रसूतीवेळी मात्र साध्या रस्त्याअभावी जीव गमवावा लागला. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.