
इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंना टीम इंडियामध्ये (Team india)स्थान मिळाले आहे. आगामी घरच्या टी-20 मालिकेसाठी निवडकर्त्यांनी निवडलेल्या संघामध्ये आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले आहे. युवा उमरान मलिक आणि अर्शदीप यांना संधी मिळाली, तर हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनी पुनरागमन केले आहे.
हार्दिक पांड्या
दुखापतीमुळे दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिक पांड्याने आयपीएलच्या या मोसमामध्ये चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार या नात्याने गुजरात संघाला त्याने स्पर्धेचा चॅम्पियन बनवले आणि बॉल तसेच बॅटने दमदार कामगिरी करून अंतिम फेरीत सामनावीर ठरला.
उमरान मलिक
दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 मालिकेदरम्यान ज्या खेळाडूवर सर्वाधिक लक्ष असेल तो वेगवान गोलंदाज उमरान मलिक असेल. या खेळाडूने आपल्या वेगवान गोलंदाजीने जगातील दिग्गजांना वेड लावलं आहे. या मोसमात 22 विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.
केएल राहुल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. या आयपीएल हंगामात एक फलंदाज म्हणून, त्याने लखनऊ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझीसाठी चांगली कामगिरी केली, दोन शतकांसह, तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर राहिला.
दिनेश कार्तिक
प्रदीर्घ कालावधीनंतर दिनेश कार्तिकला त्याच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियात आता पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्याने शानदार खेळ दाखवला. सातत्यपूर्ण वेगाने धावा केल्याचा पुरस्कार त्याला या मालिकेसाठी निवडीच्या रूपाने मिळाला.
अर्शदीप सिंग
23 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने आपल्या शानदार यॉर्करने सर्वांना प्रभावित केले आहे. या हंगामात पंजाब किंग्जकडून सातत्याने उत्कृष्ट गोलंदाजी केल्याने निवडकर्त्यांनी त्याची घरच्या मालिकेसाठी निवड केली.