Online Share Trading Scam: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचा खेळ; अकाउंटंट तरुणाला 3.63 कोटींचा गंडा

मुंबई: सायबर गुन्हेगारीचे थरकाप उडवणारे प्रकरण समोर आले असून, मुंबईतील एक 21 वर्षीय अकौंटंट आणि खासगी फर्मचा भागीदार तब्बल 3.63 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाने मुंबई पोलिसांच्याही भुवया उंचावल्या असून, ही मुंबईतील आतापर्यंतची सर्वात महागडी सायबर फसवणूक मानली जात आहे.
ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून गुन्हेगारांनी लुबाडले
तक्रारदार तरुणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगसाठी आकर्षित करण्यात आले. त्याला मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. यानंतर एका बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाती उघडण्यास भाग पाडण्यात आले आणि तिथे गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे पाठवायला सांगितले गेले. हा प्रकार 10 मार्च ते 25 मार्च 2025 या 15 दिवसांच्या कालावधीत घडला.
24 वेगवेगळ्या व्यवहारांतून कोटींचा व्यवहार
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, फसवणूक झालेली रक्कम 24 वेगवेगळ्या बँक व्यवहारांतून ट्रान्सफर करण्यात आली. विशेष म्हणजे, 21 मार्च रोजी एका दिवसातच चार ट्रान्सफरद्वारे तब्बल 1.2 कोटी रुपये आरोपींना पाठवले गेले.
ग्रँट रोड सायबर पोलिस ठाण्यात FIR
तक्रारदाराने 24 एप्रिल रोजी ग्रँट रोड येथील दक्षिण क्षेत्र सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक, विश्वासघात आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपी परदेशातून हे ऑपरेशन करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याचे आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही अधिकृत तपासणी न करता मोठ्या परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.