
मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey)यांना ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. त्यांना 5 जुलै रोजी साडे अकरा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता संजय पांडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तीन दिवसांपूर्वीच संजय पांडे हे सेवानिवृत्त झाले आहेत.
आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचं नाव समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीकडून त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. 5 जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
30 जून रोजी ते सेवानिवृत्त झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांना ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या प्रकरणात ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.