मुंबई – गेले अनेक दिवस वेगवेगळ्या वादात सापडलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड डीजी परमबीर सिंह यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आणि सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने त्यांच्या विरुद्ध तत्काळ निलंबणाची कारवाई केली आहे.
परमबीर सिंह यांच्यासोबतच दुसऱ्या प्रकरणातील आरोपी अतिरिक्त पोलिस अधीक्षक पराग मणेरे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. पराग मणेरे हे सिंह यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि मुंबईचे डीसीपी होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यादिवशी निलंबनाचा आदेश मंजूर करण्यात आला.
परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यानंतर त्यांची महाराष्ट्र होमगार्ड प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. मात्र परमबीर सिंह गेले सहा महिने नेमून दिलेल्या कामावर हजर झाले नाहीत. परमबीर सिंह यांनाप्रकृतीच्या कारणास्तव 29 ऑगस्टपर्यंत रजाही देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही ते आपल्या कामावर हजर झाले नव्हते. त्यामुळेच ही मोठी कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे.
मार्चमध्ये, जेव्हा त्यांना अँटिलिया बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले, तेव्हा त्यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.
अनिल देशमुख यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधून महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोपही परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राज्यात एकच खळबळ माजली होती. या धक्कादायक आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतरही अनिल देशमुख त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले होते. मात्र पुढे जाऊन अनिल देशमुखांना अटक झाली आणि ते सध्या कारागृहात आहेत.