भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंहवर लैंगिक छळाचा आरोप

WhatsApp Group

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला प्रशिक्षकाच्या तक्रारीनंतर संदीप सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. चंदीगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रीडामंत्र्यांविरुद्ध आयपीसीच्या कलम 354, 354 A, 354 B, 342 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354 A, 354 B, 342 आणि 503 अंतर्गत क्रीडामंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी राज्याच्या ज्युनियर अॅथलेटिक्स प्रशिक्षकाने क्रीडामंत्र्यांवर आरोप केले. एका दिवसानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, क्रीडा मंत्री संदीप सिंह यांनी महिला प्रशिक्षकाचे आरोप फेटाळून लावत स्वतंत्र चौकशीची मागणी केली. त्याचवेळी राज्याचे पोलीस महानिरीक्षक पीके अग्रवाल यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी रोहतक रेंजच्या अतिरिक्त महासंचालक ममता सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये अनेक उच्च पोलीस अधिकारी सामील आहेत.

2016 च्या रिओ ऑलिम्पिकनंतर संदीप सिंह यांनी इन्स्टाग्रामवर संदेश पाठवल्याचा आरोप महिला प्रशिक्षकाने केला होता. महिलेने असेही सांगितले की, संदीपने तिला आपल्या कार्यालयात बोलावून सांगितले होते की, तू मला खुश ठेव, मी तुला आनंदी ठेवीन. महिलेच्या म्हणण्यानुसार, क्रीडा मंत्री संदीप सिंह यांनी तिचा विनयभंग केला. पण कस तरी स्वतःला वाचवून ती तिथून बाहेर आली. असा तिने आरोप केला आहे. आपल्याला जाणीवपूर्वक गोवले जात असल्याचे संदीप सिंह यांचे म्हणणे आहे.