नागपूर: गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगलव्याप्त क्षेत्र असल्यामुळे येथील हत्तींचा उपद्रव शेती तसेच मानवी वस्त्यांपर्यंत होत आहे. या हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिले.
वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती व वाघ यांच्यामुळे होणाऱ्या संपत्तीच्या नुकसानाबाबत सेमिनरी हिल्स येथील वन विभागाच्या हरी सिंह सभागृह येथे आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव होळी, कृष्णा गजबे, सुभाष धोटे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख शैलेंद्र टेंभूर्णीकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, नागपूर मुख्य वनसंरक्षक श्रीमती लक्ष्मी, गडचिरोली मुख्य वनसंरक्षक एस. रमेश कुमार आदी उपस्थित होते.
गडचिरोलीचा दोन तृतीयांश भाग जंगलाने व्यापलेला आहे. मागील काही वर्षात 23 हत्तींचा कळप येथे आलेला होता. या कळपामुळे येथील घरांचे नुकसान होत आहे. नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी. तसेच हत्तींमुळे काढणी केलेल्या धान तसेच शेतमालाचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत तरतूद करावी, अशा सूचना वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
जंगलालगत असलेल्या पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करण्याच्या शक्यतेची तपासणी करावी. गडचिरोली जिल्ह्यातील वाघ व हत्तींचा वावर असलेल्या 52 गावांमध्ये वनहद्दीवर कुंपण उभारण्याची कार्यवाही करावी. याकरिता आवश्यक निधी श्यामाप्रसाद मुखर्जी योजना किंवा जिल्हा योजना निधीमधून घेण्यात यावा. तसेच प्रलंबित नुकसान भरपाईच्या प्रकरणातील गावकऱ्यांना तत्काळ अर्थसहाय्य देऊन याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.