
आशिया कप 2022 चे काउंट डाउन सुरु झाले आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागल्या आहेत. या सामन्याची चाहते किती आतुरतेने वाट पाहत आहेत, याचा अंदाज या सामन्याची तिकिटे अवघ्या 3 तासांत विकली गेली यावरूनच लावता येईल. 28 ऑगस्ट रोजी या दोघांमध्ये हाय व्होल्टेज सामना खेळला जाणार असून या मोठ्या सामन्यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली मोठं विधान केलं आहे.
गेल्या वर्षी T20 विश्वचषक स्पर्धेत 10 गडी राखून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ प्रथमच पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गांगुलीने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानचा सामना बाकी सामन्यांसारखाच आहे. संपूर्ण लक्ष आशिया कप जिंकण्यावर आहे.
गांगुली पुढे म्हणाला, मी याकडे आशिया कप म्हणून पाहत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान अशी कोणतीही स्पर्धा मला दिसत नाही. मी खेळत होतो त्या दिवसांतही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना माझ्यासाठी इतर सामन्यांसारखाच होता. मी नेहमीच स्पर्धा जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले. भारत हा एक महान संघ असून अलीकडच्या काळात त्याने चांगली कामगिरी केली असून आशिया चषक स्पर्धेतही संघ अशीच कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
भारत 7 वेळा चॅम्पियन आहे. आशिया कपमध्ये भारताने 14 वेळा पाकिस्तानचा सामना केला आहे, ज्यामध्ये भारताने 8 सामने जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. आशिया चषक 2014 मध्ये मीरपूर येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्ध पराभव झाला होता. सौरव गांगुलीनेही विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल मोठं विधान केलं आहे. आशिया चषक स्पर्धेत कोहली चांगल्या पद्धतीने खेळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. कोहलीला सराव करू द्या, त्याला सामने खेळू द्या, तो मोठा खेळाडू आहे आणि तो पुनरागमन करेल. असं गांगुली म्हणाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र यावेळी हा संघ नव्या शैलीत दिसणार आहे. संघाचा प्रशिक्षक आता राहुल द्रविड आहे आणि कर्णधारपदही रोहित शर्माकडे आहे.