शिंदे सरकारचा मोठा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13,600 रुपयांची मदत

WhatsApp Group

मुंबई : राज्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर बुधवारी (10 ऑगस्ट) मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील एक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा तर दुसरा मुंबई मेट्रोशी संबंधित आहे. शेतकऱ्यांबद्दल बोलायचे तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांची हेक्टरी मर्यादा वाढवून एनडीआरएफच्या दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. काही ठिकाणी पंचनामा करण्याचे काम बाकी आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शिवसेना आणि भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कधीही दिलेली नव्हती एवढी भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची अधिक भरपाई, हेक्टरची मर्यादाही वाढली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘एनडीआरएफच्या नियमानुसार दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासोबतच दोन हेक्टरची मर्यादाही तीन हेक्टर करण्यात आली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
एनडीआरएफच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 6800 रुपये नुकसान भरपाई मिळते. शिंदे सरकारने हेक्टरी दुप्पट म्हणजे 13,600 रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.