विमान प्रवास आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! इंधनाच्या दरात मोठी वाढ; एअर इंडिया, इंडिगोसह अनेक कंपन्यांनी वाढवले तिकीट दर

WhatsApp Group

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता विमान वाहतूक क्षेत्राला (Aviation Industry) बसला आहे. जागतिक स्तरावरील या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असून जेट इंधनाच्या (ATF) दरात विक्रमी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी ८५-९० डॉलर प्रति बॅरल मिळणारे इंधन आता थेट १५० ते २०० डॉलरवर पोहोचले आहे. इंधनाचे दर दुप्पट झाल्यामुळे एअरलाईन्स कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून, त्याचा बोजा आता प्रवाशांच्या खिशावर टाकला जात आहे.

तिकीट दरांमध्ये मोठी दरवाढ

विमान कंपन्यांच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात इंधनाचा वाटा सुमारे २५ टक्के असतो. इंधन महागल्याने एअर इंडिया आणि इंडिगो सारख्या प्रमुख कंपन्यांनी ‘फ्यूल सरचार्ज’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. केवळ तिकीटच नाही, तर प्रवाशांना आता जास्तीचे सामान (Excess Baggage) आणि इतर सेवांसाठीही जादा पैसे मोजावे लागत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला यामुळे मोठी कात्री बसणार आहे.

विमान कंपन्यांचे मोठे निर्णय

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जगभरातील विमान कंपन्यांनी आपापल्या रणनीतीत बदल केले आहेत. एअर एशियाने आपल्या विमान फेऱ्यांमध्ये १० टक्क्यांनी कपात केली असून २० टक्के फ्यूल सरचार्ज लागू केला आहे. तर डेल्टा एअरलाईन्स आणि युनायटेड एअरलाईन्सने आपल्या उड्डाणांची क्षमता कमी करून बॅगेज फीमध्ये वाढ केली आहे. लुफ्थांसा आणि तुर्किश एअरलाईन्सनेही तात्पुरत्या स्वरूपात दरवाढ लागू केली असून अनेक कंपन्यांनी आपल्या विस्तारीकरण योजना तूर्तास स्थगित केल्या आहेत.

हवाई प्रवास अजून महागणार?

हवाई वाहतूक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, जर पश्चिम आशियातील तणाव लवकर निवळला नाही, तर जेट इंधनाचे दर अजून वाढू शकतात. अशा परिस्थितीत हवाई प्रवास सर्वसामान्यांसाठी अधिक महागडा होईल आणि त्याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवरही होऊ शकतो. एअरलाईन्स कंपन्यांना आपला तोटा कमी करण्यासाठी आगामी काळात अजून कठोर निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे.