जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये मंगळवारी संध्याकाळी लष्कराच्या जवानांनी भरलेले वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले. गाडीत 18 सैनिक होते. या अपघातात 5 जवान शहीद झाले आहेत, तर 10 जवान जखमी झाले आहेत. बेपत्ता 3 जवानांचा शोध सुरू आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ही घटना पुंछ जिल्ह्यातील एलओसीजवळ घडली. पूंछ जिल्ह्यातील मेंढारच्या बालनोई भागात हा अपघात झाला. सध्या लष्कराच्या जवानांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. माहिती मिळताच 11 एमएलआयच्या क्विक रिस्पॉन्स टीमनं घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केलं.
या दुर्घटनेनंतर लष्कराच्या व्हाइट नाइट कॉर्प्सनं अधिकृत निवेदन जारी करून शहीद जवानांप्रती शोक व्यक्त केला आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू आहे. जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. याआधी 4 नोव्हेंबरला राजौरी येथे झालेल्या अपघातात 2 जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. 2 नोव्हेंबर रोजी रियासी येथे ट्रक दरीत कोसळल्यानं 3 जवानांचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराचे वाहन खड्ड्यात पडून शहीद झालेल्या जवानांना काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियंका गांधी यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्यानं अनेक जवान शहीद झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. जखमी सैनिक लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करते.